रविवार, २० जानेवारी, २०१३

जोगिया : ग. दि. माडगूळकर

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग
दुमडला गालिचा, तक्‍के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली.

झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी अजुनी नाही नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.

हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते ? - गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी.

साधता विड्याचा घाट, उमटली तान
वर लवंग ठसता होसी कशी बेभान ?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने ?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भाव स्वरांचा योग
घमघमे, जोगिया दंवात भिजुनी गाता
पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.

"मी देह विकुनिया मागुन घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनिया 'अनमोल'
रक्‍तात रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र देही तिळाएवढी जागा.

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लाविते पान... तो निघून गेला खाली.

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !"

नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार
हासून म्हणाल्ये, "दाम वाढवा थोडा ...
या पुन्हा, पान घ्या ..." निघून गेला वेडा !

राहिले चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला ?

तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्ये बसले परि रतिक्लांत
वळुनी न पाहता कापित अंधाराला
तो तारा तुटतो- तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे.



सुरावटीवर तुझ्या उमटती गीत -ग. दि. माडगूळकर

सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले
कशास पुसशी प्रश्न प्रेयसी तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले

काल रात्री मी जाग जागलो अवघे जग जरी होते निजले
जागरणाचे कारण राजा तुला समजले, मला समजले

तीन दिवस ना भेट आपुली कितीदा माझे डोळे भिजले
आंसू मागील भाव अनामिक तुला समजले, मला समजले

तुझ्या नि माझ्या मनात राणी गूज खोलवर एकच रुजले
कुजबूज काही केल्याविन ते तुला समजले, मला समजले

मनोरथांचा उंच मनोरा, मजल्यावरती चढले मजले
मधुचंद्रास्तव लाभे वास्तू तुला समजले, मला समजले

मला आणखी तुला आपुले दोघांचेही भाव उमजले

सौंदर्याची खाण पाहिली गीत-ग. दि. माडगूळकर

सौंदर्याची खाण पाहिली, पाहिली आम्ही पहिल्यांदा
नयनांमधला बाण लागला, लागला आम्हा पहिल्यांदा

वाटते परंतु सांगाया ना जुळे
डोळ्यांत आमुच्या भाव नवे आगळे
बोलल्या वाचुनी गूज तुम्हाला कळे
शब्द मधाचे ठिबकू द्यात ना, ठिबकू द्या कानी पहिल्यांदा

हा रंग गोड का गालावरची खळी
पाहता आमुच्या पावन झाल्या कुळी
उपजली उगीचच मनात आशा खुळी
घायाळाची गती समजली, समजली आम्हा पहिल्यांदा

या आधी आम्हा माहीत नव्हती प्रीती
परि आज सुखाचा स्वर्ग लागला हाती
कधी दोन मनांची जुळून येतील नाती
नकळत चेटुक होय आम्हावर, आम्हावर असले पहिल्यांदा



हे चिंचेचे झाड दिसे गीत -ग. दि. माडगूळकर

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !

बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे
ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुगुट घालिती शिरी

रुसलीस उगा का जवळी ये ना जरा
गा गीत बुल्बुला माझ्या चितपाखरा
हा राग खरा की नखर्‍याचा मोहरा
कितीवार मी मरू तुझ्यावर किती करु शाहिरी

हर रंग दाविती गुलाब गहिरे फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके
त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी



शपथ या बोटांची: ग. दि. माडगूळकर

शपथ या बोटांची, शपथ या ओठांची
तुझी मी जोडीदार

शपथ वनाची रे, शपथ मनाची रे
आकाशाची, दिशांगनाची
शपथ धरतीची, शपथ नवतीची
तुझी मी जोडीदार

शपथ खगांची रे, शपथ नगांची रे
प्रीत भारल्या उभ्या जगाची
शपथ या वार्‍यांची, नभातील तार्‍यांची
तुझी मी जोडीदार

शपथ जळाची रे, शपथ कुळाची रे
तरु-लतिकांची, फुलाफुलांची
शपथ या श्वासांची, सुगंधीत वासांची
तुझी मी जोडीदार

शपथ आजची रे, शपथ उद्याची रे
सागरवेड्या सर्व नद्यांची
शपथ रे प्रीतीची, शपथ रे नीतीची
तुझी मी जोडीदार

शनिवार, १९ जानेवारी, २०१३

माणूस माझे नाव: बाबा आमटे





माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...

मराठी असे आमुची मायबोली :माधव ज्युलियन




मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥

रविवार, १३ जानेवारी, २०१३

लागेल जन्मावें पुन्हां:विंदा करंदीकर


माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हां नेण्या तुला मझ्या घरी.
तूं झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचें लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी.
तूं बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढें,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती कांहीतरी.
होशी फुलासह फूल तूं अन् चांदण्यासह चांदणे,
- तें पाहणें, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करीं.
म्हणतेस तूं, ” मज आवडे रांगडा सीधेपणा!”
विश्वास मी ठेवूं कसा या हुन्नरी शब्दावरीं.
लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.
- विंदा करंदीकर

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी ..... विंदा करंदीकर


सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी
घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी
माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी
संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी
वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी
गीत – विं. दा. करंदीकर
संगीत – यशवंत देव
स्वर – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी.....विंदा करंदीकर

 

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी

भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी

गीत – विं. दा. करंदीकर
संगीत – यशवंत देव
स्वर – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

जडाच्या जांभया ..... विंदा करंदीकर




रडण्याचेंही बळ नाही;
हसण्याचेही बळ नाही;
मज्जा मेली; इथें आतां
जीवबाची कळ नाही.
संस्कृतीला साज नाही.
मानवाला माज नाही;
आज कोणा, आज कोणा,
जीवनाची खाज नाही.
इथें आतां युद्ध नाही;
इथें आतां बुद्ध नाही;
दु:ख देण्या, दु:ख घेण्या
इथे आतं शुद्ध नाही.
भावनेला गंध नाही;
वेदनेला छंद नाही;
जीवानाची गद्य गाथा
वाहतें ही; बंध नाहीं!
चोर नाही; साव नाही;
मानवाला नांव नाही;
कोळ्शाच भाव तेजीं
कस्तुरीला भाव नाही.
जागतें कैवल्या नाही;
संशयाचे शल्य नाही;
पापपुण्या छेद गेला.
मुक्ततेला मूल्य नाही.
जन्मलेल्या बाप नाही;
संचिताचा ताप नाही;
यापुढे या मानवाला
अमृताचा शाप नाही.
—-जाणीवेची याच साधी
राहिली मागें उपाधीं;
– या जडाच्या जांभया हो
ना तरी आहे समाधी!
- “मृदगंध” विंदा करंदीकर

शनिवार, १२ जानेवारी, २०१३

काही बोलायाचे आहे,

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही

शिणलेल्या झाडापाशी ;कुसुमाग्रज

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.

- मुक्तायन, कुसुमाग्रज

बुधवार, ९ जानेवारी, २०१३

एवढे लक्षात ठेवा-विंदा करंदीकर


उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा

ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी
ती न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा

जाणती जे सांगती ते ऐकूनी घ्यावे सदा
मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा

चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता
उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा

विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी
सीमा तयाला असावी एवढे लक्षात ठेवा

दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले
तो गुरूचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा

माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी
त्याने स्वत:ला जिंकणे एवढे लक्षात ठेवा

-विंदा करंदीकर

त्याला इलाज नाही-विंदा करंदीकर


धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

-विंदा करंदीकर 

मरून पडलेला पांडुरंग


वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात

मग भुरभुर वारा सुटला...
छोट्या स्टेशनवर न थांबता
एक्सप्रेस गाडी
धाड धाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला

बियाच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!

कवी - दासू वैद्य

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

राधा : ग्रेस

स्वर्गातुन आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावुन घेतला
जिवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपुर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरारीने फोफावले
आणी भिंतीवर झुकुन
रुक्मिणीच्या अंगणात फुले ढाळु लागले
सत्यभामेचा  चडफडाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मुळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वॄक्षाच्या अवयवांचे पॄथ्थकरण करुन
कॄष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणी स्वत मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणुनच त्याने या विकॄत मत्सराचे प्रतिक अंगणात खोचुन दिले
राधेसाठी त्यानी असला वॄक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वतच तर कृष्णकळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसे काय रुजणार
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणी अष्ट्नाईकांच्याही पुर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हिच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतिक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला

कविवर्य ग्रेस

गुरुवार, ३ जानेवारी, २०१३

बगळ्यांची माळ फुले - वा. रा. कांत





बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात

छेडिति पानात बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले उन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

त्या गाठी, त्या गोष्टी नारळिच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते कुठुनि अंतरात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

हातांसह सोन्याची सांज गुंफताना,
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना,
कमळापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात