सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

कवी ........ दासू वैद्य

कवीच्या कवितेत
चिमण्या चिवचिवतात
पण कवी स्वतःच्या घरात
चिमण्यांना खोपा करू देत नाही
तसा त्याचा फारसा विरोध नसतो
चिमण्यांच्या खोप्याला
होतं काय, खोप्यातून कचरा खाली पडतो
आणि कवीची बायको वैतागते
झाडावर कविता लिहिणारा कवी
झाडाची मुळं भिंत पोखरतात
म्हणून हिरवीगार झाडं तोडतो
कवी टाळतो पाहणं
स्वतःच्या पायाला पडलेल्या भेगांकडे
कवी दुर्लक्ष करतो
बायकोच्या रापलेल्या चेहर्‍याकडे
आणि गिरवत बसतो सखीचं चित्र
खूप हळूवार बरंच निरागस,
कधी कवी घासलेटाच्या रांगेत उभा असतो
मग त्याच्या शब्दांना येतो घासलेटाचा वास
शाळेतल्या वर्गात
कवीची कविता
उदात्त भावना वगैरे म्हणून शिकवली जाते,
दरम्यान कुठल्यातरी अनामिक स्टेशनवर
कवीचा छिन्नविछिन्न देह रूळावर सापडतो,
भक्कम चाकाची रेलगाडी आपल्या अजस्त्र पायांनी
तुडवून गेलेली असते कवीला,
पंचनाम्यात कवीच्या खिशात
किराणामालाची यादी
आणि रेलगाडीवरची
एक लोभस कविता सापडते.

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

~जन्म - बा. सी. मर्ढेकर

नाही कोणी का कुणाचा । बाप-लेक, मामा-भाचा,
मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री? ॥

आई गोंजारते मुला । कासया हा बाप-लळा,
बाईलप्रीतीच्याही कळा । कशास्तव? ॥

येतें ऊर कां भरून । जाती आतडीं तुटून,
कुणी कुणाचा लागून । नाही जर? ॥

कैसा बांधला देखावा । जननमरणांतून देवा,
कुशीकुशींत गिलावा । रक्तमांसीं? ॥

का हें बांधकाम सुंदर । फक्त नश्वरतेचेंच मखर
अथवा दर्शनी महाद्वार । मिथ्यत्वाचें? ॥

मग कोठे रे इमारत । जिचें शिल्पकाम अद्भुत,
जींत चिरंतनाचा पूत । वावरें की? ॥

जरी कुठे ऐसें धाम । ज्याच्या पायऱ्याही अनुपम
आणि चुना-विटा परम । चिरस्थायी ॥

तरी मग रोकडा सवाल । कोरिसी हाडांचा महाल,
ठेविशी त्यांत हरिचा लाल । नाशवंत ॥

वास्तुशास्त्र कां बिलोरी । योजिशी येथेच मुरारी,
घडसी वस्तीला भाडेकरी। बिलोरीच?


जन्म - बा. सी. मर्ढेकर


रविवार, २९ जुलै, २०१८

थांबू नकोस ना.धो.महानोर

थांबू नकोस

झाकड पडली, थांबू नकोस
ओझं होईस्तोवर कवळाचा भारा बांधू नकोस
आधीच तर तू सकवार फ़ार
चिटपाखराच्याही नजरेत भरशील अशी
त्यात,
या जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस
मोहाच्याही झाडाला मोह व्हावा. आणि या पांदीत
तुला लुबाडावं . अगदी तुझ्या सर्वस्वासकट.
बघ ना, काळोख कसा झिंगत येतोय,
तुला या काळोखात कवळून घ्यायला
थांबू नकोस!

ना धो महानोर 

बुधवार, ६ जून, २०१८

बघ आई आकाशात - शांता शेळके



बघ आई आकाशात


बघ आई आकाशात सूर्य हा आला|
पांघरून अंगावरी भरजरी शेला||

निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी|
मोतीयांच्या लावियेल्या आत झालरी||

केशराचे घातलेले सडे भूवरी|
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी||

डोंगराच्या आडून हा डोकावे हळू|
आणि फुले गुलाबाची लागे ऊधळू||

नभातून सोनियाच्या ओती तो राशी|
गुदगुल्या करी कश्या कळ्या फुलांशी।|

पाखरांच्या संगे याची सोबत छान।
गाती बघ कशी याला गोड गायन।।

मंद वारा जागवीतो सार्‍या जगाला|
म्हणतसे ऊठा ऊठा मित्र हा आला|| 

- शांता शेळके

रविवार, ७ जानेवारी, २०१८

तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला - विंदा करंदीकर

तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला - विंदा करंदीकर
तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला|
तो झाला सोहळा| दुकानात ||
जाहली दोघांची| उराउरी भेट|
उरातले थेट| उरामध्ये ||
तुका म्हणे "विल्या,| तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला" ||
शेक्स्पीअर म्हणे, | "एक ते राहिले
तुवा जे पाहिले | विटेवरी"||
तुका म्हणे, "बाबा| ते त्वा बरे केले|
त्याने तडे गेले| संसाराला ||
विठ्ठल अट्टल |त्याची रीत न्यारी |
माझी पाटी कोरी | लिहोनिया"||
शेक्स्पीअर म्हणे,| "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले| शब्दातीत"||
तुका म्हणे, "गड्या| वृथा शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |वेगळाली ||
वेगळीये वाटे| वेगळाले काटे |
काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच||
ऐक ऐक वाजे| घंटा ही मंदिरी|
कजागीण घरी| वाट पाहे"||
दोघे निघोनिया| गेले दोन दिशा|
कवतिक आकाशा| आवरेना||