मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

कांचनसंध्या कवी बा.भ.बोरकर



पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,

आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.

कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,

तिमिर दाटता बनुनि चांदणें
तीच उमलतील संथपणे.

सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,

शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं.

उभ्या जगाचे अश्रु पुसाया
जरी आपुले हात उणे

तरी समुद्रायणी प्रमाणें
पोसूं तटिची म्लान तृणें.

इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी-तळी,

असू तिथे सखि! ओला वट 
मी आणिक तूं तर देव-तळी.

शिणुनी येती गुरें-पाखरें
तीच लेकरें जाण सखे,

दिवस जरेचे आले जरी
त्या काठ जरीचा लावू सुखें...!


– बा.भ. बोरकर

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

काळी माया। बा.भ.बोरकर


 काळे काळे केश तुझे काळे काळे डोळे
 काळा काळा मेघ तुझ्या माथ्यावरी डोले
 काळी काळी ढोरे तुझी काळ्या डोहाकडे
जेथे काळ्या जांभळाचे जागोजाग सडे
 काळीतुन वाट तुझी काजळत्या वेळे
 काळ्या काळ्या सावल्यांचे सभोवती जाळे
अशा धुंद काळेपणी तीट हवी गाली
काळी चंद्रकला, काळ्या किनारीची चोळी
काळी काळी पोत हवी कंठी तुझ्या पोरी
सावासही सुचे अशा काळोखात चोरी
काळ्या काळ्या वाघळांची घेरी इथे माया
काळ्या काळ्या वासनांची घोंगावते छाया
ये ग घरी,काळा तुझा साज तिथे सारा
काळ्या घडीत या अशा हो ग उरीं तारा
       ----बा.भ.बोरकर

कशाला पंढरी जातो ?= तुकडोजी महाराज

कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो ?

संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो
कीर्तनी मान डोलतो परि कोंबडी-बकरी खातो

वडीलजनाचे श्राध्द कराया, गंगेमाजी पिंड देतो
खोटा व्यापार जरा ना सोडी, तो देव कसा पावतो

झालेले मागे पाप धुवाया देवापुढे नवस देतो
तुकड्या म्हणे सत्य आचरणावाचोनी, कोणीच ना मुक्त होतो

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

मज माहेरा जावू द्या हो -- संत गुलाबराव महाराज

मज माहेरा जावू द्या हो
उगे उगे का धरुनी ठेवता
प्रीती ही राहू द्या हो
सेवे करणी बहु हौस पुरी
त्यांची ही होऊ द्या
वर्षातून तरी तातचरण मज
डोळ्याने पाहू द्या
केस चिकटले इंद्राणी जळी
मंगलसे न्हावू द्या
हात जोडते तुम्हा जननीच्या
स्तनपाना पिवू द्या
जय जय ज्ञानेश्वर माऊली हे
वदनी या गाऊ द्या
प्रीती ही राहू द्या

संत गुलाबराव महाराज

कृपाळे स्नेहाळे -- संत गुलाबराव महाराज




कृपाळे स्नेहाळे जाण त्या पामरा
तुजवीण थारा नाही नाही
निर्धना सधना कृपणा उदारा 
तुजवीण थारा नाही नाही
पोळल्या खेळल्या कुश्चला सुंदरा
तुजवीण थारा नाही नाही
आळंदी वल्लभा  स्वामी ज्ञानेश्वरा
तुजवीण थारा नाही नाही

संत गुलाबराव महाराज

ज्ञानेश्वर माऊली हो बाई माझी--- संत गुलाबराव महाराज

                                                   संत गुलाबराव महाराज


ज्ञानेश्वर माऊली हो बाई माझी ज्ञानेश्वर माऊली
कोमल सुंदर परम मनोहर ठेवी हृदय पावूली 
त्रिविध ताप संताप साहिला करी करुणा साऊली
घेवून मजला नीज मांडीवर स्नेहे पान्हावली
अलाकावती पती नंदनी विनवणी श्रवण करुनी पावली

संत गुलाबराव महाराज