रविवार, २४ जुलै, २०१६

रामदास स्वामी रचित संपूर्ण मूळ गणपती आरती



रामदास स्वामी रचित संपूर्ण मूळ गणपती आरती
प्रचलित आरती आपण म्हणतो ती फ़क्त ३ कड़वी म्हटली जातात पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे असे म्हणतात ती खालिलप्रमाणे आहे.

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले  ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले 
विश्वरूप तया मोरयाचे देखिले  ॥ जय० ॥३॥
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा  घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
  जय ० ॥ ७ ॥

पसायदान





आता विश्वात्मके देवे l येणे वाग्यज्ञे तोषावे ll
तोषोनी मज द्यावे l पसायदान हे ll

जे खळांची व्यंकटी सांडो l तयां सत्कर्मी रति वाढो ll
भुतां परस्परे पडो l मैत्र जीवांचे ll

दुरितांचे तिमिर जावो l विश्व स्वधर्मसूर्ये पाहो l
जो जे वांच्छील तो ते लाहो l प्राणिजात ll

वर्षत सकळमंगळी l ईश्वरनिष्ठांची मांदियाळी l
अनवरत भूमंडळी l भेटतु भूतां ll

चला कल्पतरुंचे आरव l चेतना चिंतामणीचे गाव l
बोलते जे अर्णव l पीयुषांचे ll

चंद्रमे जे अलांच्छन l मार्तंड जे तापहीन ll
ते सर्वांही सदा सज्जन l सोयरे होतु ll

किंबहुना सर्वसुखी l पूर्ण होऊनी तिही लोकीं ll
भजि जो आदिपुरुखी l अखंडित ll

आणि ग्रंथोपजीविये l विषेशी लोकी इये l
दृष्टादृष्टविजये ll होआवे जी ll

येथ म्हणे श्रीविश्वेश्वराओ l आ होईल दान पसावो l
येणे वरे ज्ञानदेवो l सुखियां जाला ll

-
श्री ज्ञानेश्वर महाराज

मृग - ग. दि. माडगुळकर





माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी

दुबळी माझी झोळी - ग. दि. माडगूळकर




पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,||धृ||

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,||१

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..||२

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. ||३