शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

सण एक दिन



शिंगे रंगविली,
बाशिंगे बांधली
चढविल्या झुली,
 ऐनेदार

राजा परधान्या,
 रतन दिवाण
वजीर पठाण, ।
तुस्त मस्त


वाजंत्री वाजती,
 लेझिम खेळती
मिरवीत नेती,
बैलाला गे

डुल-डुलतात,
 कुणाची वशींडे
काही बांड खोंडे,
अवखळ

कुणाच्या शिंगाना,
बांधियले गोंडे
पिवळे तांबडे,
शोभिवंत

वाजती गळ्यात,
 घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा,
ऐसा चाले

जरी मिरवीती,
 परि धन्या हाती
वेसणी असती,
घट्ट पट्टा

झुलीच्या खालती,
कायनसतील
आसूडांचे वळ,
उठलेले

आणि फुटतील,
उद्याही कडाड
ऐसेच आसूड,
पाठीवर

सण एक दिन,
बाकी वर्षभर
ओझे मर मर,
ओढायाचे


मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

अस्थाई. बा.सी.मर्ढेकर



अस्थाईवर स्थायिक झालों,
चुकून गेला पहा अंतरा
ओरडून का अता लागणे
ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा!

नशेत झुकला निशापती अन्
अस्मानाच्या कलल्या तारा;
अंधारावर विझून गेला
रात्रीचा या वीज-पिसारा

क्लिन्न मनोगत मोटारींचें
कुशींत शिरले काळोखाच्या;
नालबंद अन् घोड्याची ये
टाप समेवर जिवंततेच्या.

शांत जगाच्या घामावरला
उडून काळा गेला वास;
बेटाबेटांतुनी मनांच्या
जराच हलला श्वासोच्छ्वास.

अस्थाईवर पुन्हा परतलों,
चुकून गेला पहा अंतरा;
ढिल्या गळ्यावर षड्ज बांधणें
अता खालचा परंतु हसरा.

कवी - बा.सी.मर्ढेकर