रविवार, १४ मे, २०२३

ज्यांची हृदये झाडांची -मंगेश पाडगावकर


ज्यांची हृदये झाडांची 
- मंगेश केशव पाडगावकर
******
ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात
तेच वाढतात प्रकाश पितात, तेच ऋतू झेलून घेतात.

त्यांना मुळीच गरज नसते व्याख्यानबाज कंठांची
आणि कानठळ्या बसवणार्‍या अध्यात्मिक घंटांची.

त्यांना माणूस.. शिडी नसतो पाय ठेवून चढण्याची
त्यांच्या कुशित जागा असते हरलेल्याला दडण्याची.

ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात
तेच फक्त गुच्छासारखा पावसाळा हुंगून घेतात. 

-- मंगेश केशव पाडगावकर

बुधवार, १० मे, २०२३

पाऊस आला. ग्रेस

पाऊस आला पाऊस आला 
गारांचा वर्षाव 
गुरे अडकली रानामध्ये    
दयाघना तू धाव!

मेघांचे कोसळती पर्वत 
दरी निनादे दूर  
गाव चिमुकला वाहून जाईल 
असा कशाला पूर?

इवल्याला पक्षांच्या डोळी 
वृक्ष थबकले सारे 
आणि मुळाला त्यांच्या उपटे 
वेड घेतले वारे 
 
थांब जरासा हृदयी माझ्या 
 ढगात लपल्या देवा
 काठावरती जरा आणु दे
 पुरात फसल्या नावा 
                                                            
 या गावाच्या पारावरती 
 कुणी नसे रे वेडी 
 गढीत नाही भुजंग शापित 
 जो वंशाला तोडी 

 इथे कुणीतरी रचले होते 
 झिमझिम पाऊस गाणे 
 जाता येता टाकित  होता 
 तो चिमण्यांना दाणे 
  
ग्रेस