शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

आला क्षण-गेला क्षण.. केशवसुत



आला क्षण-गेला क्षण

गडबड घाई जगात चाले
आळस डुलक्या देतो पण
गंभीरपणे घडय़ाळ बोले
आला क्षण गेला क्षण

घडय़ाळास या घाई नाही

विसावाही तो नाही पण
त्याचे म्हणणे ध्यानी घेई
आला क्षण गेला क्षण

कर्तव्य जे तत्पर त्यांचे
दृढ नियमित व्हावयास मन,
घडय़ाळ बोले आपुल्या वाचे
आला क्षण गेला क्षण

कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणीत घण,
काळ -ऐक! गातो आपुल्याशी
आला क्षण गेला क्षण

लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करती
आला क्षण गेला क्षण

आनंदी आनंद उडाला,
नवरीला वर योग्य मिळाला
थाट बहुत मंडपात चाले
भोजन, वादन, नर्तन, गान
काळ हळू ओटीवर बोले

आला क्षण गेला क्षण

कौतुक भारी वाटे लोकां
दाखविण्या पाहण्या दिमाखा
तेणे फुकटची जिणे होतसे
झटा! करा तर सत्कृतीला
सुचवीत ऐसे, काळ वदतसे
आला क्षण गेला क्षण

वार्धक्य जर सौख्यात जावया
व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया,
तर तरुणा रे! मला वाटते
ध्यानी सतत अपुल्या आण
घडय़ाळ जे हे अविरत वदते
आला क्षण गेला क्षण

केशवसुत

केवढे हे क्रौर्य! - ना.वा.टिळक

केवढे हे क्रौर्य! - ना.वा.टिळक


क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!