सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२

आनंदी आनंद गडे कवी- बाल कवी

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भर्मर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा