शनिवार, ११ जानेवारी, २०१४

‘’ नभ निळे ‘’- भारती बिर्जे डिग्गीकर



पृथ्वी वृत्त : ‘’ नभ निळे ‘’
(लगाल ललगा लगा लललगा लगागा लगा )

विमान उचले जरा जडशिळा रुपेरी कुशी
गती भरत यंत्रणा थरथरे अवाढव्यशी
सहास्य परिचारिका सुवसना करे आर्जवा
‘’सुटे धरणिबंध हा पथिकमित्रहो सज्ज व्हा’’

जसे हळुहळू चढे वर विमान वेगे उठे
घरे नगर कार्यक्षेत्र पथजाल मागे सुटे
क्षणैक नजरेपुढे झरझरा नकाशा सरे
विशाल तिमिरावरी विरळ रोषणाई उरे

उडे शकट एकटा नवनव्या प्रदेशांवरी
किती प्रहर नेणिवेत झरती उदासीपरी
अधांतरच आपले घर नवे मनाला गमे
गवाक्ष पडद्यामधे लपत शर्वरी आक्रमे

सरे समय नाकळे असत नीज की जागृती
तशात परिचारिका दिसत भास-शी आकृती
नसेच पण भास तो, हसत ती करे स्वागता
‘’उठा दिवस हा शुभंकर असो तुम्हा सर्वथा ‘’

गवाक्ष उजळे दिसे उगवती धरे लालिमा
अपार नभपोकळीत झळके नवा नीलिमा
कुठे पुसट पुंजके ढग असे वहाती सुखे
असा दिन महोत्सवी नयन पाहती कौतुके

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे

प्रवास असती किती कुठुनसे कुठे जायचे
मला निखळ वैभवी क्षण असे सवे न्यायचे
असो कलह तल्खली गलबला जिवाभोवती
परंतु एकट क्षणी नभ निळे मला सोबती ..

- भारती बिर्जे डिग्गीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा