*स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या भक्तांना वेळोवेळी लिहीलेली पत्रे*
*पत्र क्र. २५) भाग २*
संतवचन प्रत्ययाचे ।श्रवणीं पडतां आनंदें नाचें ।
म्हणें सुकृत शतजन्मांचे । साधन साचें कळले मज ॥१३॥
मग उत्कटत्वें करूं पाहे साधन ।परी तेतुला वेग न साहे म्हणोन ।
स्थिर न राहतां चंचळ मन ।होतसे खिन्न अंत:करणीं ॥१४॥
साधूं जातां सोऽहं जप ।साधनी येती नाना विक्षेप ।
पूर्वसंस्कारें संकल्प-विकल्प ।देती ताप साधकातें ॥१५॥
मग वाटें सोहंध्यान सोडावें ।बरवें रामनामचि घ्यावें ।
भावबळें रंगून जावें ।मन जडावें सगुण रूपीं ॥१६॥
सगुण रूप आठवी अंतरीं ।नाम-घोष गर्जे वैखरी ।
नाचे डोले उड्या मारी ।दूर सारी देहभाव ॥१७॥
परी तोहि आवेग ओसरे ।निघोन गेलें भक्तीचे वारें ।
नाचरें मन फिरे माघारें ।अखंड न मुरे सगुणरूपीं ॥१८॥
वृत्तीस आली चंचलता ।म्हणें कुंडलिनी जागृत होतां ।
आकाशमार्गे न चालतां । प्रकाश’ तत्वतां न दिसेचि ॥१९॥
म्हणोनि करी योगसाधन ।परी तेथेंहि न थारे मन ।
मग सद्गुरूसी रिघोनि शरण ।कृपादान मागतसे ॥२०॥
उदार सद्गुरु होती प्रसन्न ।शिष्यास सन्मुख बैसवोन ।
दाविती स्वानुभवाची खूण ।संशय निरसन जेणें होय ॥२१॥
तैं भ्रांतीचें मसैरे फिटे ।बुद्धीस न फुटती फांटे ।
संकल्प विकल्पांचे कांटे ।होती वाटेवेगळे गा ॥२२॥
दिसे चैतन्याची ठेव ।तेथें चित्त घेई धांव ।
प्रकट होता सोऽहं भाव ।नुरे नांव अहंतेचें ॥२३॥
सगुण आणि निर्गुण ।एकरूप पाहे संपूर्ण ।
श्रवण मनन निदिध्यासन ।साधन परिपूर्ण जाहलें ॥२४॥