सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल .....आरती प्रभू

तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल
घालीन मी, मी त्याला सहजिच रानभूल

केसात पानजाळी, कंठात रानवेल
तुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ

भाऊ रे शूर अती, होईल सेनापती
भाऊ रे भाऊ करून स्वारी, दुष्टास चारील धूळ

होईल बाबा प्रधान, राखील तो इमान
सुखी रे सुखी राज्य सारे चुटकीत तो करील

दिवेलागण..आरती प्रभू,




विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
एखाद्या प्राणाची दिवेलागण

सरत्या नभाची सूर्यास्तछाया
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण

एखाद्या प्राणाच्या दर्पणीं खोल
विलग पंखांचे मिटत मन

एखाद्या प्राणाचे विजनपण
च एखाद्या फुलाचे फेडीत ऋण

गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां
प्राजक्तचुंबन एखादा प्राण

तुडुंब जन्मांचे सावळेपण
एखाद्या प्राणाची मल्हारधून

एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या मनाचे कोवळे ऊन

निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण

एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे..आरती प्रभू

एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे
दाटून दाटून आले; वाहूं न गेले

जळत जळत दिवा विझत गेला
झाकत झाकत हवा पाऊस आला

भरले दोघांनी पेले, ओठांशी नेले
काळोख गर्जत आले नदी नी नाले

कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्या
वाकड्या हृदयलाटा जोडीत

बाहूंत बंदिस्त केला प्रत्येक दीस
असाच फुलांचा झाला केवळ वास

एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे
दाटून दाटून आले; वाहून गेले


आरती प्रभू