भा. रा. तांबे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भा. रा. तांबे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

हे कोण गे आई ?

नदीच्या शेजारीं
गडाच्या खिंडारीं
झाडांच्या ओळींत
वेळूंच्या जाळींत
दिवसां दुपारीं
जांभळी अंधारी-
मोडकें देऊळ
त्यावरी पिंपळ,
कोण गे त्या ठायीं
रहातें गे आई ? १
चिंचांच्या शेंड्यांना
वडांच्या दाढ्यांना
ओढोनी हालवी
कोण गे पालवी ?
कोण गे जोरानें
मोठ्यानें मोठ्यानें
शीळ गे वाजवी
पांखरां लाजवी ?
सारखी किति वेळ
ऐकूं ये ती शीळ ? २
वाळलीं सोनेरी
पानें गे चौफेरी
मंडळ धरोनी
नाचती ऐकोनी
किती मीं पाहिलें
इत्‌केंची देखिलें,
झाडांच्या साउल्या
नदींत कांपल्या.
हांका मीं मारिल्या,
वांकोल्या ऐकिल्या. ३
उरांत धडधडे.
धावतां मी पडे,
पळालों तेथून-
कोण ये मागून ? ४ 

डोळे हे जुलमि गडे

डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहुं नका !
जादुगिरी त्यांत पुरी येथ उभे राहुं नका.
घालुं कशी कशिदा मी ? होती किति सांगुं चुका !
बोचे सुइ फिरफिरुनी वेळ सख्या, जाय फुका.
खळबळ किति होय मनीं !
हसतिल मज सर्वजणी;
येतिल त्या संधि बघुनि आग उगा लावुं नका !
डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहुं नका !

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

"तुझ्या गळा, माझ्या गळा- भा. रा. तांबे


"तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा"
"ताई, आणखि कोणाला ?
चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !
आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !
मला कुणाचे ? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !
आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?
सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसू खुसू, गालि हसू
वरवर अपुले रुसू रुसू !"
"चल निघ, येथे नको बसू
घर तर माझे तसू तसू"

"कशी कशी, आज अशी
गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी
तर मग गट्टी कोणाशी ?"

- भा. रा. तांबे

सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

रे हिंदबांधवा - भा.रा.तांबे



रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोऱ्यांची कोंडी फोडित, पाडित वीर इथे आली ll ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ll

मावळत्या दिनकरा - भा.रा.तांबे




मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करा !

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा

उपकाराची कुणा आठवण ?
शिते तोवरी भूतेअशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा !

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा !

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा !

जन पळभर म्हणतिल - भा. रा. तांबे




जन पळभर म्हणतिल हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?

रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?