मंगेश पाडगावकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मंगेश पाडगावकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

एकमेकांशिवाय. मंगेश पाडगावकर.


एकमेकांशिवाय. मंगेश पाडगावकर.


एकामेकांशिवाय
आपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.
तरीही ओळखतो भुकेचा वास. इच्छांचे वळसे.
हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.
गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो.
आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन.
एकमेकांजवळ. एकमेकांना. एकमेकाने.एकमेकांहून.
एकमेकांआत : एकमेकांशिवाय.

असेच बसतात प्रत्यय स्वार होऊन सगळे उपाशी भाषेवर :
आणि असा चालतो आशयाचा प्रवास.
एकदाच अवलिया भाषेच्या देशातुन परागंदा होतो:
अज्ञात काळोखांतला अचानक पाऊस शब्दहीन एकांतात फांदि होऊन पितो:
त्याला आपण पुरतो : दैनिक पेपरांच्या डोंगर रद्दीखाली.
पों पों पीं पीं ट्रिंग ट्रिंग खट खट हैलो हैलो एकमेकांजवळ.एकमेकाना.एकमेकाहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय.


मंगेश पाडगावकर.

तुझी वाट पाहणे सोडणार नाही : मंगेश पाडगांवकर

तुझी वाट पाहणे सोडणार नाही : मंगेश पाडगांवकर

सोनेरी प्रजक्ताचा सडा 
न जाणो मागतोय 
कोणती रांगोळी
सुगंधात गहिऱ्या 
पाठवतो बोलावणी
मागतो फक्त तुझ्याच 
समंजस ओंजळी

***********************

जाणार आहेस खुशाल जा
इतका मात्र लक्षात ठेव
असेही कधी घडले होते
तुझ्या नकळत तुझे डोळे
माझ्यासाठी रडले होते
*************************

तू सजवलेल स्वप्नांच घरटे
मी कधीच तोडणार नाही
तू ये किंवा नको येऊ
तुझी वाट पाहणे सोडणार नाही 

: मंगेश पाडगांवकर


अजुन---- मंगेश पाडगांवकर




रात्रीं झडलेल्या धारांची

ओल अजून हि अंधारावर

निजेंत अजुनी खांब विजेचा

भुरकी गुंगी अन तारांवर

भित्र्या चिमणीपरी, ढगांच्या

वळचणींत मिणमिणे चांदणी

मळक्या कांचेवरी धुक्याच्या

वाऱ्याची उमटली पापणी

कौलावरुनी थेंब ओघळे

हळुच, सांचल्या पाण्यावरतीं;

थेंब ध्वनीचा हवेंत झुलतो

गिरकी घेऊन टांचेवरतीं

गहिऱ्या ओल्या कुंदपणांतच

गुरफटलेली अजुन स्तब्धता

कबूतराच्या पंखापरि अन

राखीकबरी ही अंधुकता

अजून आहे रात्र थोडिशी,

असेल अधिकहिकुणि सांगावें?

अर्धी जाग नि अर्धी निद्रा

इथेंच अलगद असें तरावें!

-
मंगेश पाडगांवकर

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

सांगा कसं जगायचं?---मंगेश पाडगावकर


सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून तुमची आठवण 
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!

काळ्याकुट्ट काळोखात 
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात 
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे 
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!

सांगा कसं जगायचं
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

 कवी मंगेश पाडगांवकर

सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

शुक्रतारा मंद वारा -- मंगेश पाडगावकर




शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥

मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझा आज तू पवना वाहा
तू असा जवळी रहा ॥ २ ॥

लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा ॥ ३ ॥

शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटूनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फ़ांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा ॥ ४ ॥

प्रेम म्हणजे प्रेम असतं !! मंगेश पाडगांवकर




प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करत येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चूकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात ती
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लगतात
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !

लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तारीसुद्धा चाललं असतं :
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी मणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण
चक्क मला म्हणाला:
"
आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही !

पाच मुलं झाली तरी
प्रेमबी कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का ?
प्रेमाशिवाय अडलं का ? "

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हणलं :

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं मात्र 'सेम' नसतं !

तिच्या सोबत पावसात कधी
भिजला असाल जोडीने !
एक चोकलेट अर्ध अर्ध
खाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत
तासनतास फिरला असाल
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!

दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!

मंगेश पाडगांवकर