शनिवार, २३ मार्च, २०१३

अजूनही-- कुसुमाग्रज


अजूनही
निळया जांभळ्या नदीला
आंबेवनाची सावली
भेट पहिलीवहिली
अकल्पित
...
भेट दुरस्थपणाची
गर्भरेशमी क्षणाची
सौदामिनीच्या बाणाची
देवघेव.
गुलबक्षीच्या फुलानी
गजबजले कुपण
वेचू लागला श्रावण
मोरपिसे।
ओल्या आभाळाच्या खाली
इद्रचापाचे तुकडे
तुझा करपाश पडे
जीवनास.
कधी रेताडीचे रस्ते
कधी मोहरली बाग
कधी प्रासादास आग
कर्पुराच्या।
सप्तसुरातुनी गेले
माझ्या जीवनाचे गीत
तुझ्या सारगीची तात
साथ झाली.
बर्फवाट शिशिराची
आता पुढलिया देशी
तुझ्या मिठीची असोशी
अजूनही.

-
कवी कुसुमाग्रज

शुक्रवार, २२ मार्च, २०१३

जगत मी आलो असा


जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

(रंग माझा वेगळा ह्या काव्यसंग्रहातून)

सुरेश भटांची कविता

गाभारा-- वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

 
दर्शनाला आलात? या..

पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर
त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.

- कुसुमाग्रज

रविवार, १० मार्च, २०१३

मनातल्या मनात मी - सुरेश भट



मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे;
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले,
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी,
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी;
'
दुरून कोण हा तुझा मकरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा,
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो ! 

शुक्रवार, ८ मार्च, २०१३

वादळवेडी! कवी कुसुमाग्रज.


 
नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

...
उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात

- कवी कुसुमाग्रज.

गुरुवार, ७ मार्च, २०१३

कोठडी- स्वातंत्र्यवीर सावरकर



अंदमानात कैद्यांना स्वत:ची कोठडी स्वत:च साफ करावी लागे. ती साफ करतांना तात्यांच्या मनात आलेले विचार या कवितेतून त्यांनी मांडले.

 "लिंपुनि शिंपुनि जें । कायतरी
सजविसी दिवस भरी
बंदि मंदिर तें। एकादा
महाल वा सोनेरी?"
अजि नचि केवल या। बंदिच्या
भिंति त्या भुयारांच्या
रक्षिति अवसेसी। माझ्या ज्या
पासुनिया पुनवेच्या
"तरि रे कोठडीच्या। या कृरा
भिंति तोडुंची रे धीरा
झटशील तरी होई। न क्वचित का
पूर्ण मुक्तता शक्या?
पूर्णा? अजि ना ना । मातीच्या
भिंति भंवति या साच्या
दगडी भिंती दुज्या!
"आशा सोडिना या जगतीं
दगडांच्याही या भिंती
धुळीला रे मिळती
तटहि किती
तडकूनिया तुटती!"
तरिही काय? अहो । आंशिक ती
शक्य "पूर्ण" ना मुक्ती
या तटांपुढती। बंदिच्या
क्षितिजांच्याही भिंती!
"परिसूं परि आम्ही । कुणीकुणी
त्याही ओलांडोनी
वृत्तींच्या क्षितिजा । वरिलीची
पूर्ण मुक्तता त्यांनी!"
रंगात उषेच्या आणी । सांजेच्या
चित्रिलें विश्वकर्म्यानें। ज्या साच्या
आकाश छता त्या। "मी"च्या। हलक्यांच्या
हंसू-असूंच्या या। झोपाळ्या
वरतीचि झुलत तया
पाहत होतों कीं। होतें जों
दिसत तोवरीं तरि त्यां!