ना.धो.महानोर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ना.धो.महानोर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ जुलै, २०१८

थांबू नकोस ना.धो.महानोर

थांबू नकोस

झाकड पडली, थांबू नकोस
ओझं होईस्तोवर कवळाचा भारा बांधू नकोस
आधीच तर तू सकवार फ़ार
चिटपाखराच्याही नजरेत भरशील अशी
त्यात,
या जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस
मोहाच्याही झाडाला मोह व्हावा. आणि या पांदीत
तुला लुबाडावं . अगदी तुझ्या सर्वस्वासकट.
बघ ना, काळोख कसा झिंगत येतोय,
तुला या काळोखात कवळून घ्यायला
थांबू नकोस!

ना धो महानोर 

रविवार, २१ जुलै, २०१३

घन ओथंबून येती,--ना.धो.महानोर,

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला

चांद केवडयाची रात,--ना.धो.महानोर,

चांद केवडयाची रात, आलीया सामोरा
राजा माझ्या अंबाडयाला बांधावा गजरा
तुझ्या गाण्यानं वेढलं शाहीरा, माझं जीवन आलया मोहोरा

तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा
अशा झोकात झिंगले शाहीरा, मन वादळवार्‍यांत भोवरा

शुभ्र काचेत पारा, तसा संग साजुरा
हिरव्या आषाढ वनात डांगोरा, कसा पाण्यात लाविला अंगारा

जरा बांध गजरा, माझी आण शाहीरा
नव्या फुलून आलेल्या संसारा, माझ्या घराला सोन्याचा उंबरा 

मन चिंब पावसाळी--ना.धो.महानोर,

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावी
केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले

वळण वाटांतल्या--ना.धो.महानोर

वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद 
वाहत्या निर्झरांचे गुंतले भवबंध 

अशीच बांधलेली जन्मांची नातीगोती 
स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती 
मातीचा गंध ओला, दरवळ रानभरी 
पिकांत वेचताना पाऊस ओल्या पोरी 

कौलारू घरट्यांशी तुळशीवृंदावन 
ऊसाच्या सावल्यांशी पांघरू येतं मन 
आकाश पांघरूनी निर्मळ गाणं गावं 
पक्ष्यांच्या पंखावर माहेरी रोज यावं