गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१३

आधार :कुसुमाग्रज

निरोप - कुसुमाग्रज



गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"
जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

नाते : कुसुमाग्रज

आगगाडी आणि जमीन / कुसुमाग्रज




नको ग!नको ग !!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून

धावसी मजेत
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले चुरून !

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितीक ढाळसी
वरून निखारे !

नको ग !नको ग!!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेभान होऊन !

ढगात धुराचा
फवारा सोडून
गर्जत गाडी ती
बोलली माजून -

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन !धावेन !

चला रे चक्रानो ,
फिरत गरारा
गर्जत पुकारा
आपुला दरारा !

शीळ अन कर्कश
गर्वात फुंकून
पोटात जळते
इंधन घालून

शिरली घाटात
अफाट वेगात
मैलाचे अंतर
घोटात गिळीत !

उद्दाम गाडीचे
ऐकून वचन
क्रोधात इकडे
थरारे जमीन

"दुर्बळ भेकड !
त्वेषाने पुकारी
घुमले पहाड
घुमल्या कपारी!

हवेत पेटला
सूडाचा घुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश !

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडली खालती !

तो मुक्त प्रवासी कुसुमाग्रज



मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले
परमेश्वर नाही घोकत मन मम बसले,
तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले?
स्मित करुनी म्हणाल्या चांदण्या काही
तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही,
उठतात तमावर त्याची पाउलचिन्हे,
त्यांनाच पुससी तू आहे कि तो नाही !