बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

पाठीवर बाहुलीच्या - ग्रेस



पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोऱ्या  मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार …..

प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?

पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज

न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली

जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख

पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप

रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली

- ग्रेस

पाखरांची शाळा - ग. ह. पाटील



पाखरांची शाळा भरे पिंपळा वरती
चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती

उतरते उन जाते टाळुनी दुपार
पारावर जसा यांचा भरतो बाजार

बाराखड्या काय ग आई घोकती अंगणी
उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी

तारेवर झोके घेती बसुनी रांगेत
भुरकन इथे तिथे उडती मौजेत

खेळकर किती नको कराया अभ्यास
परीक्षेत का न आई व्हायचे नापास

पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
गळकी ग शाळा यांची भिजती सगळे

रविवारी सणवारी आमुच्यासारखी
नाही ना सुट्टी भली मोडली खोडकी

यांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे का?
गप्प शाळेमध्ये कधी धरितो न हेका

होतो पास आम्ही कधी दिपोती बक्षीस
मौज काय सांगू मिळे सुट्टी हि शाळेस

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१३

देता का थोडेसे शब्द उसने !--ग्रेस

सांगायला माझ्या जिवाचे दुखणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

मी शब्द जपून वापरले
कधीच केले नाहीत वायफळ खर्च
तरीही आज मागावं लागतय कर्ज

मी शब्दांची केली पूजा
पण जेव्हा आला परतफेड करायचा मोका
तेव्हाच नेमका दिला यांनी मला धोका

आवडत नाही मला शब्दांचे रूसणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

सुखात शब्द साथ देतात
प्रेमातही बरोबर असतात
आज दु:खातच शब्द तोटके पडले
आज माझे मन एकटेच रडले

गायला हे रडगाणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

परत करीन मी तुम्हाला हे शब्द
शब्द फुटत नाहीत, रडूच फुटतय
शब्द गेल्यामुळे जीव तीळ-तीळ तुटतोय

आज शब्दबध्द करायला रडणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

- ग्रेस

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

या हाताने स्तन गोंदून घे--ग्रेस

या हाताने स्तन गोंदून घे
लाव मंदिरी दिवा
फूल होऊनी अंधाराचे
गळून पडे काजवा
तू मरणावर मग रेखावे
प्राक्तनगंधी मोती
की डोहावर किणकिणते गे
शतजन्मांची भीती
असुनी तुझा मी तुझी दूरता
तुला झाकितो काल
संग उर्मिले कुणी बांधले
नयनी चंद्रमहाल
रंग उगा की उभा उदासिन
महामेघ क्षितिजात
पायाखाली वाळवंट मग
उगवत ये निमिषात
लाव मंदिरी दिवा..
लाव मंदिरी दिवा परंतु
सोड स्तनांची माया
मरणावाचून आज सजविली
मीच आपुली काया!
- ग्रेस

अलगद भरूनी यावे.- ग्रेस



क्षितिज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी.
गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही; अलगद भरूनी यावे.
- ग्रेस

ते चंद्रगंध विटले --ग्रेस

ते चंद्रगंध विटले चोळी दुधात भिजली
पाठीत वाकतांना आई गळ्यात हसली
आभाळ सावल्यांचे झाले नदीत गोळा
आई घरी मुलांना वाटून दे उन्हाळा
देशी कुण्या विदेशी भुलली कळे न सांज
आई निजे दुपारी उलटी करून शेज

या मादीचा सूर -- ग्रेस

 आई माझी कंचुकीतल्या
तरल स्तनांचे दूध
गोरज वेळी वाटत फिरतो
जोगी कुठले वेध?..
..त्याही नंतर आई निघते
कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला
या मादीचा सूर..’

‘घर थकलेले --ग्रेस

‘घर थकलेले संन्यासी
हळुहळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमध्ये
नक्षत्र मला आठवते
ती नव्हती संध्या-मधुरा,
रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी
आभाळ घसरले होते.
पक्ष्यांची घरटी होती
ते झाड तोडले कोणी?
एकेक ओंजळीमागे
असतेच झऱ्याचे पाणी.

माझी आई --ग्रेस,

माझी आई मत्त वासना
संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या
करुणेचेही फूल..
माझी आई भिरभिर संध्या
घेई सूर्य दिलासा
नश्वर शब्दांच्याही ओठी
काव्यकुळातील भाषा..



‘‘आता लिहिताना काही
जरा वेगळे वाटते
माझ्या लेखणीची ओळ
तिळातिळाने तुटते
शब्द अनाथ दिसती
रेष हळूच ओढावी-
टिंब ठेवूनही अंती
गीत अपुरे वाटते..’’

‘माझी आई : सुमित्रा’ ग्रेस

परसदाराला चंदनाच्या डहाळीची सुगंधी कडी लावून
ती केव्हाच निघाली बेभान :
प्रियकरांचे, यारांचे निर्घृण वध, तर डोळी त्यांचेच
धगधगते बेमुर्वत इमान!
संध्या मलुल, पांगळी, अस्तसूर्याच्या भाराने वाकलेली :
तुटलेली कर्णव्याकूळ करंगुळी..
देवासारखे हसता येईल मला : मला संतासारखे रडता
येईल? तिच्या कपाळी, चंद्रमौळी..’

चोरून अमेच्या रात्री --ग्रेस

चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता.

तुला पाहिले मी नदीच्या किनारी --ग्रेस,


तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठिवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्ष-माळेतले सावळे
तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मना वेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

कवी – ग्रेस 

गेलें उकरून घर,--ग्रेस,

गेलें उकरून घर,
नाही भिंतींना ओलावा;
भर ओंजळीं चांदणें,
करूं पाचूंचा गिलावा.

आण लिंबोणी सावल्या,
नाहीं आढ्याला छप्पर;
वळचणीच्या धारांना
लावूं चंद्राची झाल्लर.

पाय ओढत्या वाळूची
आण तेव्हांची टोपली;
कधी खेळेल अंगणीं
तुझी-माझीच सावली?

गेलें उकरून घर
जाऊं धुक्यांत माघारा,
कधीं पुरून ठेवल्या
आणूं सोन्याच्या मोहरा.

कवी - ग्रेस

वाटा--ग्रेस,



माझ्या मनापाशी
चैतन्याचा क्षण
निळी आठवण
बाभळीचे डोळे
डोळ्यांतला काटा
माझा मला वाटा

 ग्रेस,

एक--ग्रेस


एक हात तुझा एक हात माझा
जसा शब्द खुजा शब्दापाशी
एका हृदयाला एकच क्षितिज
आकाशाचे बीज तुझ्या पोटी
एका कुशीसाठी एकाचे निजणे
बाकीची सरणे स्मशानात

ग्रेस 

वाटेपाशी--ग्रेस,



रात्र थांबवुनी असेच उठावे
तुझ्यापाशी यावे क्षणासाठी!
डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी
आणि दिठी दिठी शब्द यावे!
तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा
अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी
आणि उजाडता पाठीवर ओझे
वाटेपाशी तुझे डोळे यावे!

 ग्रेस

मर्म--ग्रेस,


ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
          थांबू नये!
...असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
       स्पर्शू नये

ती गेली तेव्हा - ग्रेस

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता



गीत - ग्रेस
 

 

चांदणे शिंपीत जाशी... राजा बढे

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी तारा फुले ॥ध्रु.॥

वाहते आकाशगंगा की कटीची मेखला
तेज:पुजाची झळाळी तार पदरा गुंफीले ॥१॥

गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी , बोलावरी नादावले ॥२॥

गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी
पाहुदे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे ॥३॥

 
गीतकार:   राजा बढे

मी भातुकलीचा खेळ ...ग्रेस,

शब्दांनी हरवूनी जावे
क्षितिजांची मिटता ओळ
मी सांजफुलांची वेळ

वृक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चंद्रखुणांची
मी निळीसावळी वेल

गात्रांचे शिल्प निराळे
स्पर्शाचा तुटला गजरा
मी गतजन्मीची भूल

तू बावरलेला वारा
पायांत धुळीचे लोळ
मी भातुकलीचा खेळ