मंगळवार, २८ जानेवारी, २०१४

पिपांत मेले ओल्या उंदिर - बा.सी.मर्ढेकर

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

भंगु दे काठिन्य माझे--- बा. सी. मर्ढेकर,


भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे

धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे

जाऊ दे 'कार्पण्य' 'मी' चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी

माझी कन्या - बी


गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
का ग आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला ’लंकेच्या पार्वती’ समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारिरत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

नेत्रगोलातुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,
’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुन वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदता, अनुभवि जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा
प्राप्त होता परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्‌गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !

शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

तू तेव्हा अशी,---आरती प्रभू




तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी 
कवितेच्या ईश्वराची.



- आरती प्रभू


थोर जोंधळ्याची पात ----- आरती प्रभू


थोर जोंधळ्याची पात
पात वाकली भारान
कणसा कणसा मध्ये दाण
दाण तुडुंब जारान

जार वाळला उन्हान
झाली उन्हाची साखर
गेली वार्यावर वार्ता
आली दूरची पाखर

चित्त थारावर नाही
रावबाजीच्या लेकीचं
तोंडी बांधून घुंगरू
फेकी पाखरू नेकीच


आरती प्रभू

 

गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

उगवले नारायण---- बहिणाबाई चौधरी



उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll

उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll

उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll

वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll

हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll

मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll

*बहिणाबाई चौधरी

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

पहाटे पहाटे मला जाग आली गीत :सुरेश भट

 वृत्त भुजंगप्रयात-

ल गा गा    ल गा गा    ल गा गा    ल गा गा
१  २  २    १  २  २    १  २  २    १  २  २



पहाटे पहाटे मला जाग आली

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली ॥धृ.॥

मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली ॥१॥

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात, माझा उशाला
मऊ मोकळे केस, हे सोड गाली ! ॥२॥

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे, हालचाली ! ॥३॥

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणार्‍या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली

गीत :सुरेश भट

‘’ नभ निळे ‘’- भारती बिर्जे डिग्गीकर



पृथ्वी वृत्त : ‘’ नभ निळे ‘’
(लगाल ललगा लगा लललगा लगागा लगा )

विमान उचले जरा जडशिळा रुपेरी कुशी
गती भरत यंत्रणा थरथरे अवाढव्यशी
सहास्य परिचारिका सुवसना करे आर्जवा
‘’सुटे धरणिबंध हा पथिकमित्रहो सज्ज व्हा’’

जसे हळुहळू चढे वर विमान वेगे उठे
घरे नगर कार्यक्षेत्र पथजाल मागे सुटे
क्षणैक नजरेपुढे झरझरा नकाशा सरे
विशाल तिमिरावरी विरळ रोषणाई उरे

उडे शकट एकटा नवनव्या प्रदेशांवरी
किती प्रहर नेणिवेत झरती उदासीपरी
अधांतरच आपले घर नवे मनाला गमे
गवाक्ष पडद्यामधे लपत शर्वरी आक्रमे

सरे समय नाकळे असत नीज की जागृती
तशात परिचारिका दिसत भास-शी आकृती
नसेच पण भास तो, हसत ती करे स्वागता
‘’उठा दिवस हा शुभंकर असो तुम्हा सर्वथा ‘’

गवाक्ष उजळे दिसे उगवती धरे लालिमा
अपार नभपोकळीत झळके नवा नीलिमा
कुठे पुसट पुंजके ढग असे वहाती सुखे
असा दिन महोत्सवी नयन पाहती कौतुके

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे

प्रवास असती किती कुठुनसे कुठे जायचे
मला निखळ वैभवी क्षण असे सवे न्यायचे
असो कलह तल्खली गलबला जिवाभोवती
परंतु एकट क्षणी नभ निळे मला सोबती ..

- भारती बिर्जे डिग्गीकर

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या (कुसुमाग्रज)



स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा
सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती
मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा
रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला
जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला
हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा


 (कुसुमाग्रज)