नारायण सुर्वे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नारायण सुर्वे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

कार्लमार्क्स --- नारायण सुर्वे

माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला
मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता
जानकी अक्का म्हणाली, 'वळिखलंस ह्याला
ह्यो आमचा मार्क्सबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला
संन्याशाला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच तुझ्यासारखी
त्यालाही चार कच्चीबच्ची होती.'
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला

पुढे; एका सभेत मी बोलत होतो
तर या मंदीचे कारण काय ?
दारिद्र्याचे गोत्र काय ?
पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला
आणि घडाघडा बोलतच गेला

परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.
मी म्हणालो -
'
आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,
या पुढच्या सर्व चरित्रांचेही.'
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत;
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,.
'
अरे, कविता-बिविता लिहीतोस की काय ?.
छान, छान
मलासुध्दा गटे आवडायचा.'

--  नारायण सुर्वे 

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

माझी आई - नारायण सुर्वे


जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू
शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पांचानी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

इतका वाईट नाही मी---कवि :- नारायण सुर्वे

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस
तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस
हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको
आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

कवि :- नारायण सुर्वे

रविवार, २१ एप्रिल, २०१३

दोन दिवस- नारायण सुर्वे


दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।


- नारायण सुर्वे