सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

मन माझे मोहुन गेले- ना. वा. टिळक



वन सर्व सुगंधित झाले
मन माझे मोहुन गेले - कितीतरी

मी सारे वन हुडकीले
फुल कोठे नकळे फुलले - मज तरी
स्वर्गात दिव्य वृक्षास
बहर ये खास
असे क्ल्पीले - असे क्ल्पीले
मन माझे मोहुन गेले - कितीतरी

परी फिरता फिरता दिसले
फुल दगडाआड लपाले - लहानसे
दिसण्यात फार ते साधे
परी आमोदे
जगामधी पहिले - जगामधी पहिले
मन माझे मोहुन गेले - कितीतरी

मी प्रेमे वदलो त्यासी
का येथे दडुनी बसशी - प्रिय फुला?
तू गडे फुलांची राणी
तुला गे कोणी
रानी धाडिले- रानी लावीले?
मन माझे मोहुन गेले - कितीतरी

ते लाजत लाजत सुमन
मज म्हणे थोडके हसुंन - तेधवा
निवडले प्रभूने स्थान
रम्य उद्यान
तेच मज झाले- तेच मज झाले
मन माझे मोहुन गेले- कितीतरी

-
ना. वा. टिळक

हिवाळा : बा. सी. मर्ढेकर



न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

बा. सी. मर्ढेकर

तेथे कर माझे जुळती : बा. भ. बोरकर


दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥

गीतकार : बा. भ. बोरकर

श्रावण बाळ : ग. ह. पाटील



शर आला तो धावुनी आला काळ
विव्हळला श्रावण बाळ
हा ! आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी

त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा

मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले
कावड त्यांची
घेवून मी काशिला
चाललो तीर्थयात्रेला
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे
तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला

मी एकुलता पुत्र कसा हा घाला
मजवरती अवचित आला
त्यां वृध्दपणी
मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा बघतील ते
वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होउनिया श्रावण बाळ

परी झांकुनी सत्य कसे हे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
ते येतील माझ्यामागे
घ्या झारी... मी जातो.. त्याचा बोल
लागला जावया खोल
सोडीला श्वास शेवटला
तो जीव - विहंग फडफडला
तनु - पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी

कवी : ग. ह. पाटील