सुरेश भट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुरेश भट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २० जानेवारी, २०२०

मलमली तारुण्य माझे,----गीत - सुरेश भट

मलमली तारुण्य माझे,
तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या,
तू जीवाला गुंतवावे

लागुनी थंडी गुलाबी,
शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन्
मी तुझ्यामाजी भिनावे

तापल्या माझ्या तनूची
तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे,
पुन्हा तू पेटवावे

रे! तुला बाहुत माझ्या,
रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे,
तू मला बिलगून जावे.
-----------------

गीत - सुरेश भट

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!--सुरेश भट,


मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!

विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!

सहज कधी तू घरात
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

सोमवार, २५ ऑगस्ट, २०१४

हा ठोकरून गेला- सुरेश भट



हा ठोकरून गेला,तो ठोकरून गेला
जो भेटला मला तो वांधा करून गेला

वेशीवरी मनाच्या आले सारे सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला

माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली
काटाच प्यार आता जो मोहरून गेला...

चाहूल ही तुझी की ही हूल चांदण्याची
जो चंद्र पाहिला मी तो ही दुरून गेला

आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा
माझाच भास माझ्या अंगावरून गेला..


 गझल - सुरेश भट
 इथे --गायक - सुधाकर कदम

बुधवार, १४ मे, २०१४

सूर मागू तुला मी कसा गीत : सुरेश भट

सूर मागू तुला मी कसा
जीवना तू तसा, मी असा ॥धृ.॥

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळीले
दुःख माझा तुझा आरसा ॥१॥

एकदा ही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो, खेळ झाला जसा ॥२॥

खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा ॥३॥

रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडापिसा ॥४॥

काय मागून काही मिळे ?
का तुला गीत माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा वसा ॥५॥

गीत : सुरेश भट

रविवार, २ मार्च, २०१४

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी--- सुरेश भट

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते
मराठी ||

सुरेश भट
〰〰〰〰〰〰

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

पहाटे पहाटे मला जाग आली गीत :सुरेश भट

 वृत्त भुजंगप्रयात-

ल गा गा    ल गा गा    ल गा गा    ल गा गा
१  २  २    १  २  २    १  २  २    १  २  २



पहाटे पहाटे मला जाग आली

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली ॥धृ.॥

मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली ॥१॥

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात, माझा उशाला
मऊ मोकळे केस, हे सोड गाली ! ॥२॥

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे, हालचाली ! ॥३॥

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणार्‍या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली

गीत :सुरेश भट

रविवार, २१ जुलै, २०१३

ओठी तुझ्या न आले --सुरेश भट,

अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही

येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

हे दु:ख राजवर्खी, ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही 

झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही

गर्दित गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाव नाही

जावे कुण्या ठिकाणी उध्वस्त पापियांनी
संतांतही घराच्या राखेस भाव नाही

उच्चारणार नाही कोणीच शापवाणी
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

शुक्रवार, १९ जुलै, २०१३

दीपदान - कविवर्य सुरेश भट



फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला.... मला कुठे वर्तमान होते

असा कसा तो प्रवास होता दिले दगे सारखे तरूंनी
दुपारचे ऊन्ह सावलीच्या सुखातही विद्यमान होते

सवाल माझ्या स्वतंत्रतेला करून आताच ते निघाले
स्वतःच जे चोरट्या सुखाचे निलाजरे बंदिवान होते

तुझ्यापुढे न्यायदेवतेने कबूलही पिंजऱ्यात केले-
'तुझ्या चुका वंदनीय होत्या! तुझे गुन्हे पुण्यवान होते!'

अताच कोणी फकीर माझ्या घरापुढे ओरडून गेला
शिकस्त झालास तू न बेटा, तुझे इरादे महान होते!

घरोघरी हीच एक चर्चा- तिचे घराणेच राजवंशी!
(जिते न जे बंडखोर ज्यांचे भिकारडे खानदान होते)

अता स्मरे एवढेच... तेव्हा कुठेतरी खोल दंश झाला...
खरेच का सोनकेवड्याचे मनात माझ्या रान होते?

असे दिले शब्द शृंखलांनी.... असा दिला त्वेष दुःखितांनी
दुभंग मी राहिलो तरीही अभंग माझे इमान होते

तुम्ही मला पाहिलेच कोठे? तुम्ही मला भेटलाच कोठे?
जिथे मला गाठले तुम्ही ते जिवंत माझे स्मशान होते

जरा तुझ्या अंगणात आलो... उनाड वाऱ्यासवे उडालो...
अता फुलांना विचार, 'येथे खरेच का एक पान होते?'

मुठीत घेऊन जीव माझा कसातरी जन्म काढला मी
तयार बाहेर सूळ होता... घरात भिंतीस कान होते

अम्हास फिर्यादही खुनाची तुझ्यापुढे आणता न आली
तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते

म्हणू नका आसवात माझे बुडून केव्हाच स्वप्न गेले
उदास पाण्यात सोडलेले प्रसन्न ते दीपदान होते

शुक्रवार, २२ मार्च, २०१३

जगत मी आलो असा


जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

(रंग माझा वेगळा ह्या काव्यसंग्रहातून)

सुरेश भटांची कविता

रविवार, १० मार्च, २०१३

मनातल्या मनात मी - सुरेश भट



मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे;
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले,
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी,
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी;
'
दुरून कोण हा तुझा मकरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा,
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !