शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

उरल्या सुरल्या ओलाव्यावर. शांता शेळके

उरल्या सुरल्या ओलाव्यावर
.          शांता शेळके
***********************

उरल्या सुरल्या ओलाव्यावर
किती जिवाला भिजवित राहू ?
म्लान आठवांतुनी चार या
किती बहर मी सजवित जाऊ ?

बुजत चालल्या पाऊलवाटा
हिरवे रुजवे फुटले त्यावर
तिथेच वळते हट्टी पाऊल
कसा तया मी घालू आवर ?

भिंत कोसळे या इथली अन्
उठे इमारत उंच पलिकडे
पालटात या जलद, किती मी
जुन्या खुणांचे वेचू तुकडे ?

मिटली अवघी क्षितिजे म्हणता
क्षितिज त्यातुनी पुनश्च उठते
कळसूत्री बाहुली तशी मी
पुन्हा यंत्रवत् धावत सुटते

शांता शेळके