रविवार, २ मार्च, २०१४

तोच चंद्रमा नभात--- शांता शेळके

तोच चंद्रमा नभात
तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप
तीच तुंहि कामिनी ॥धृ॥

नीरवता ती तशीच
धुंद तेंच चांदणे
छायांनी रेखियले
चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच
तीच गंधमोहिणी ॥१॥

सारे जरि ते तसेच
धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच तीच तुंहि
प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरांत
स्वप्न ते न लोचनी ॥२॥

त्या पहिल्या प्रीतीच्या 
आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ
गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून 
भंगल्या सुरांतुनी ॥३॥

 शांता शेळके

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी--- सुरेश भट

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते
मराठी ||

सुरेश भट
〰〰〰〰〰〰

खाली डोकं, वर पाय ! -- मंगेश पाडगावकर


 जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !



--
मंगेश पाडगावकर

पालखीचे भोई - शंकर वैद्य



पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण? आम्हां पुसायाचे नाही!

घराण्याची रीत जुनी पीढीजात धंदा
पोटाबरोबर जगी जन्मा आला खांदा
खांद्याकडे बघूनीच सोयरीक होई ॥

काटंकुटं किडकाची लागे कधी वाट
कधी उतरण, कधी चढणीचा घाट
तरी पाय चालतात, कुरकुर नाही ॥

वाहणारा आला तेव्हा बसणारा आला
मागणारा आला तेव्हा देणाराही आला
देणाऱ्याचं ओझं काय न्यावयाचं नाही?

बायलीचा पडे कधी खांद्यावरती हातं
कडे घेतलेलं पोर तिथं झोपी जातं
पालखीचा दांडा मग लई जड होई ॥

 शंकर वैद्य

हा असा राहु दे असाच खाली पदर--- रॉय किणीकर

हा असा राहु दे असाच खाली पदर
हा असा राहु दे असाच ओला अधर
ओठात असु दे ओठ असे जुळलेले
डोळ्यात असु दे स्वप्न निळे भरलेले

संपेल कधी ही शोधायाची हाव
फोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
अश्रुत भिजावी विझताना ही ज्योत

ही वाट वेगळी तुझी नसे रे त्यांची
ही दुनिया आहे केवळ हसणाऱ्यांची
दाखवू नको रे डोळे ते भिजलेले
जा तुडवित काटे, रक्ताने जरी भरलेले

काळोख खुळा अन खुळीच काळी राणी
संकोच मावला मिठीत सुटली वेणी
अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ
ओठात चुंबने भरली काठोकाठ

गुदमरली काजळकाठावरची धुंदी
कळवळली हिरवी तळटाचेवरची मेंदी
पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ
पदरातुनी फिरली एक तान्हुली मूठ

ओठात अडकले चुंबन रुसले गाल
कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल
घालता उखाणा फणा रुपेरी खोल
अंकुरले अमृत ढळता नाभी कमळ