बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

कृष्णजन्म रचना.... गदिमा

कृष्णजन्म

रचना.... गदिमा

अजन्मा जन्मासी आला
कारागिरी, अंधकारी कृष्णजन्म झाला || धृ ||

देवदुर्लभा सती देवकी
तिच्या तनूची करुनी पालखी
अनंत आले मानवलोके
प्रसव-व्यथेविन, ऊरी होता तो
उदरी अवतरला, अजन्मा जन्मासी आला ||१||

तम मावळले, तेज फाकले
चारच डोळे, दिपून झाकले
अरुप रुपी उभे ठाकले
देव दुंदुभी उधळू लागल्या,
मंजूळ स्वरमाला, अजन्मा जन्मासी आला ||२||

सुगंध सुटला एक अनामिक
मुग्ध शांतता होय सुवासिक
अद्भूत ल्याले वेष अलौकिक
धन्य होऊनी, वसुदेवांनी
नमस्कार केला, अजन्मा जन्मासी आला ||३||

परमानंदा सापडला स्वर
उमटे वाणी गंभीर कातर
"जाणियले मी तू सर्वेश्वर"
बालरुप घे, जगन्नायका
तार धरित्रीला, अजन्मा जन्मासी आला ||४||

रुप गायीचे घेऊन धरणी
आली होती तुझिया चरणी
अवघे आहे माझ्या स्मरणी
तिज रक्षाया, जनकपणा तू
वसुदेवा दिधला, अजन्मा जन्मासी आला ||५||

बघता बघता त्रिभुवन चालक
इच्छामात्रे झाला बालक
मेघ सावळे, नयनाल्हादक
उठे जन्मदे, कुशीत होता
रुदन शब्द ओला, अजन्मा जन्मासी आला ||६||

"सोsहं  सोsहं"  नाद उमटता
वळुनी कवळी देवकी माता
फुटला पान्हा, तान्हा बघता
तुटे शृंखला, बंधनातुनी
मोक्षकरी आला, अजन्मा जन्मासी आला ||७||

बाहेरून तो गर्जे वारा
नाचू लागल्या श्रावणधारा
भिजली दारे, भिजल्या कारा
झडली कुलुपे, कड्या उघडल्या
बंदिवास सरला, अजन्मा जन्मासी आला ||८||