गुरुवार, १९ मार्च, २०१५

प्रेम - सुधीर मोघे




दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं

फिरुनी नवी जन्मेन मी -सुधीर मोघे,



एकाच या जन्मी जणूं
फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील सार्‍या लयाला व्यथा
भंवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही उदासी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी,
तरीही मला लाभेन मी

आशा उद्याच्या डोळयांत माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचूनी
माझ्या मनीचे गुज घ्या जाणूनी
या वाहणार्‍या गाण्यांतूनी
लहरेन मी, बहरेन मी,
शिशिरातुनी उगवेन मी

-
सुधीर मोघे

मित्रा - सुधीर मोघे




मित्रा,
एका जागी नाही असे फार थांबायचे
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

दूरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणभाक
तुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक
रक्त इमानी तयाने असे नाही भुलायाचे
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल
जन्मगाठ जिवघेणी तुला तोडावी लागेल
निरोपाचे खारे पाणी कुणा दिसू न द्यायचे
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

होय, कबूल; तुलाही हवा कधीचा निवारा
गर्द झाडाची सावली आणि चंदनाचा वारा
पण पोरक्या उन्हात, सांग कोणी पोळायचे?
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

माझे मन तूझे झाले- सुधीर मोघे




माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले ॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी ॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन ॥