संत तुकडोजी महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत तुकडोजी महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

दे वरची असा दे ....तुकडोजी महाराज


या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे

नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
दे वरचि असा दे

जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
दे वरचि असा दे

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

या झोपडीत माझ्या---संत तुकडोजी महाराज



राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥

संत तुकडोजी महाराज