शनिवार, १२ जून, २०२१

सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,


सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,

कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे |

कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ||धृ||

या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी, 

घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी,

केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ||१||

या रानी, माझी करुणावाणी, काया कष्टील प्राणी,

ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी,

संकट होउनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ||२||

त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा,

लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा,

श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ||३||

*********:

नारायण स्वामींचे शिष्य गोपाळ यांनी लिहलेले पद.

गुरूविरहाने कासाविस झालेल्या शिष्याचे हे मनोगत आहे.

हे गु्रुदेव मला सांगा मी  कुठे जावू.कुणाला स्मरू.काय करू. कसे राहू। कसे येवून कुरुंदवाडीला स्वामीला भेटू.मिळवू . (नरसोबा वाडी)

याजगात संसारात व्यवहारी जगण्यात खाणे पिणे उठणे निजणे हे घडतच आहे.पण मला आपल्या जवळ घेवून माझा भार  उचलणारा, पालन करणारा, तसे वचन देणारा स्वामी कुठे आहे?

मी या संसार रूपी अरण्यात अडकलो आहे.आणि अतिशय दु खीकष्टी झालो आहे .      दु:खात मी रडत आहे ,ओरडत आहे, हाका मारत आहे ही माझी करूणावाणी कोण ऐकेल   ?आणि मला सुख देईल. दु खाने, तहानेने मी मुर्छित होऊन, बेशुद्ध होऊन पडलेलो असताना मला येऊन कोण बरे पाणी पाजील?

त्याचवेळी मी सत्पुरुषांचा समूह या माझ्या डोळ्यांनी पाहिला ते जवळआले त्यांनी माझ्या कपाळाला भस्म लावले आणि सांगितले हे गोपाळा  तू भय सांडून दे.

हे सत्पुरुष म्हणजे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ होते .त्यानी या गोपाळला अभय दिले.

 

शुक्रवार, ४ जून, २०२१

दत्ता मजला प्रसन्न।होसी जरी तू वर देसी


दत्ता मजला प्रसन्न।
होसी जरी तू वर देसी ।।
तरी आनन मागेतुझसी ।
निर्धारूनि मानसी ।।धृ।।

स्मरण तुझे मज नित्य असावे ।
भावे तव तव गुण गावे.।।
अनासाक्तीने मी वागावे ।
ऐसे मन वळवावे ।।१।। 

सर्व इंद्रिये आणि मन हे 
तुझे हाती आहे ।
यास्तव आता तू लवलाहे
स्वपदी मन रमवावे ।।२।।
 
विवेक आणि सत्संगती हे 
नेत्रव्दय बा आहे ।
वासुदेव निर्मळ देहे 
जेणे त्वपदी राहे. ।।३।।
दत्ता मजला प्रसन्न होसी ---

रविवार, ३० मे, २०२१

श्री_समर्थ_रामदासस्वामी_यांची_गाथा_अभंग_ क्र.१३



#श्री_समर्थ_रामदासस्वामी_यांची_गाथा_अभंग_ क्र.१३

आरंभी वंदीन विघ्नविनायक। 
जया ब्रह्मादिक वंदितील॥१॥
वंदितील संत कवि ऋषी मुनि। 
मग त्रिभुवनीं कार्यसिद्धी॥२॥
कार्यसिद्धी होय जयासी चिंतीतां। 
त्याचे रूप आतां सांगईन॥३॥
सांगईन रूप सर्वांगें सुंदर। 
विद्येचा विस्तार तेथूनीया॥४॥
तेथूनीया विद्या सर्व प्रगटती। 
ते हे विद्यामूर्ति धरा मनीं॥५॥
मनीं धरा देव भक्तांचा कैवारी। 
संकटीं निवारी आलीं विघ्नं॥६॥
आलीं विघ्नं त्यांचा करितो संहार। 
नामें विघ्नहर म्हणोनिया॥७॥
म्हणोनिया आधीं स्तवन करावें। 
मग प्रवर्तावें साधनासी॥८॥
साधनाचे मूळ जेणें लाभे फळ। 
तोचि हा केवळ गजानन॥९॥
गजाननें देह धरिलें नराचें। 
मुख कुंजराचें शोभतसे॥१०॥
शोभतसे चतुर्भुज त्रिनयनु। 
तीक्ष्ण दशनु भव्यरूप॥११॥
भव्यरूप त्याचे पाहातां प्रचंड। 
चर्चिलें उदंड सेंदुरेसी॥१२॥
शेंदुरे चर्चिला वरी दिव्यांबरें। 
नाना अलंकारें शोभतसे॥१३॥
शोभतसे करी फरश कमळ। 
एके करीं गोळ मोदकांचे॥१४॥
मोदकांचे गोळ एके करी माळ। 
नागबंदी व्याळ शोभतसे॥१५॥
शोभतसे तेज फांकले सर्वांगीं। 
उभ्या दोहीं भागी सिद्धीबुद्धी॥१६॥
सिद्धीबुद्धी कांता ब्रह्मयाची सुता। 
सुंदरी तत्त्वतां दोघी जणी॥१७॥
दोघी जणींमध्ये रूप मनोहर। 
नाना पुष्पं हार चंपकाचे॥१८॥
चंपकाचे हार रूळती अपार। 
ब्रीदांचा तोडर वांकी पाईं॥१९॥
वांकी मुरडीवा तें अंदु नेपुरें। 
गर्जती गजरें झणत्कारें॥२०॥
झणत्कारें घंटा किंकणी वाजटा। 
कट तटीं घाटा पीतांबरू॥२१॥
पीतांबर कांसे कांसीला सुंदर। 
वस्त्रे अलंकार दिव्यरूप॥२२॥
दिव्यरूप महा शोभे सिंहासनीं। 
मूषक वहीं गणाधीश॥२३॥
गणाधीश माझें कुळींचे दैवत। 
सर्व मनोरथ पूर्ण करी॥२४॥
पूर्ण करी ज्ञान तेणें समाधान। 
आत्मनिवेदन रामदासीं॥२५॥

शुक्रवार, १४ मे, २०२१

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.

कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुनंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥

वर्षाकालिन सायंकाली
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥

कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥

गायक : मन्ना डे
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीत : वसंत पवार
चित्रपट : वरदक्षिणा (१९६२)

या गाण्याची लिंक :- 
https://youtu.be/Dp_UlProBlE