सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

प्रेमाचा गुलकंद.......प्र.के.अत्रे

बागेतुनी व बाजारातुनी
कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत
‘तिज’ला नियमाने
कशास सांगू  प्रेम तयाचे
तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग  यातले
काय असावे ते!

गुलाब कसले प्रेम पत्रिका
लाल गुलबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या
पाठोपाठ नुसत्या

प्रेमदेवता प्रसन्न हो! या
नैवद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलबी
जाणती नवतरणे

कधी न त्याचा ती अवमानी
फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला
कधीही मुग्धपणा

या मौनातच त्यास वाटले अर्थ
असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग
मनातले बोल

अखेर थकला ढळली त्याची
प्रेमतपश्चर्या
 रंग दिसे ना खुलावयाचा
तिची शान्त चर्या

धडा मनाचा करुन शेवटी म्हणे
तिला ‘देवी’
दुजी आणखी विशेषणे तो
गोन्डस तिज तो लावी

“बांधीत आलो पुजा तुज मी
आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू
भक्ताचे काज

गेंद गुलाबी मुसमुसणारे
तुला अर्पिलेले

 सांग सुन्दरी फ़ुकट का सगळे
गेले?”

तोच ओरडून त्यास म्हणे ती
“आळ वृथा  हा की
एक पाकळी ही न दवडली तुम्ही
दिल्यापैकी”

हे बोलूनी त्याच पावली आत
जाय रमणी
क्षणात घेउन ये बाहेरी
कसलीशी बरणी

म्हणे “पहा मी यात टाकले
तुमचे ते गेंद
आणि बनवला तुमच्या साठी
इतुका गुलकंद

का डोळे असे फ़िरवता का आली
भोवंड
बोट यातले जरा चाखुनी गोड
करा तोंड ”

क्षणैक दिसले तारांगण  

त्या परी शांत झाला
तसाच बरणी आणि घेवुनी
खान्द्यावरी आला

“प्रेमापायी भरला” बोले
“भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकन्द तरी
कशास हा दवडा?”

याच औषधावरी पुढे तो कसातरी
जगला


 हृदय थांबूनी कधीच ना तरी
असता तो’ खपला!

 तोंड आबंले असेल
 ज्यांचे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकन्द तयानी
चाखूनी हा बघणे..

फुलपाखरू !-- कवी- ग.ह. पाटील.


छान किती दिसते ! फुलपाखरू

या वेलींवर ! फुलांबरोबर
गोड किती हसते ! फुलपाखरू

पंख चिमुकले ! निळेजांभळे
हलवूनी झुलते ! फुलपाखरू

डोळे बारीक ! करिती लुकलुक
गोल मणी जणु ते ! फुलपाखरू

मी धरू जाता ! येई न हाता
दूरच ते उडते ! फुलपाखरू

कवी- ग.हा. पाटील.

"तुझ्या गळा, माझ्या गळा- भा. रा. तांबे


"तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा"
"ताई, आणखि कोणाला ?
चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !
आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !
मला कुणाचे ? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !
आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?
सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसू खुसू, गालि हसू
वरवर अपुले रुसू रुसू !"
"चल निघ, येथे नको बसू
घर तर माझे तसू तसू"

"कशी कशी, आज अशी
गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी
तर मग गट्टी कोणाशी ?"

- भा. रा. तांबे

या झोपडीत माझ्या---संत तुकडोजी महाराज



राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥

संत तुकडोजी महाराज

स्वप्नात पाहिली राणीची बाग.....विंदा करंदीकर


स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग
हरणाबरोबर खेळत पत्ते
बसले होते दोन चित्ते
उंट होता वाचत कुराण
माकड होते सांगित पुराण
सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरुन घेत
जिराफ होता गात छान
मानेइतकीच लांब तान
कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार
मला पहाता म्हणती सारे
एक पिंजरा याला द्यारे
त्याबरोबर आली जाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग..

कशाला काय म्हणूं नही ?...... बहिणाबाई

बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं
नही वार्‍यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं
पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं
निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं
ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं
धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं
येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं
नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं
अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं
इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं
दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं
इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं
जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं
ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं
त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं...
....... बहिणाबाई

स्फूर्ती - केशवसुत



काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
*केशवसुत