मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

बाभळी ...इंदिरा संत,

उंट ...विंदा करंदीकर,

क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, 'नाही, नाही.'
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला 'करीन काही.'
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच 'जागी'.
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.

....................
 उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली 'आहे, आहे.'
...खय्यामाने भरले पेले;
महम्मदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधीत जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
.. खूण तयाची एकच साधी..
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.

चुकली दिशा तरीही... विंदा करंदीकर,

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंडच चालायाचे म्हणूनी
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

 विंदा करंदीकर,

तीर्थाटण - विंदा करंदीकर


तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.

असा मी.. तसा मी.. कसा मी कळेना...विंदा करंदीकर,


कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
कधी वाढता वाढता व्योम व्यापी

कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी
कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे
कधी दैन्यवाणा, निराधर होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!
कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे
टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!
कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी.. तसा मी.. कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!
- विंदा करंदीकर

चुकली दिशा तरीही ..विंदा करंदीकर