शुक्रवार, २६ जुलै, २०१३

आनंदयात्री.....मंगेश पाडगावकर,

अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

नवा दिवस......मंगेश पाडगावकर,

 

भिऊन पावलं टाकू नका,
भिऊन डोळे झाकू नका!
भिनाऱ्याला
प्रकाश कोणी बघू देत नाहीत;
भिनाऱ्याला
इथे कोणी जगू देत नाहीत!

गरुडाहुन झेपावणारा
प्रत्येकाला प्राण आहे;
विश्वास ठेवा ,तुमच्या पायात
न संपणारं त्राण आहे!


विश्वास ठेवा,
विश्वास ठेवा,

नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे,
नवा दिवस विकास घेऊन येतो आहे..

कृपा......मंगेश पाडगावकर,

ज्या क्षणी माझं बाळ
पहिला पाउस झेलून आलं,
त्या क्षणी माझं र्हुदय
आभाळाशी बोलून आलं:

''आभाळा,आभाळा
अशीच कृपा राहू दे;
असेच शंभर पावसाळे

जगणं सुंदर आहे...मंगेश पाडगावकर,

माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे;
डोळे भरून
बघणं सुंदर आहे!

तुझी हाक
तळ्यावरून येते,
वाऱ्याच्या माळ्यावरून येते:
थरारून
ऐकणं सुंदर आहे;
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे;
डोळे भरून
बघणं सुंदर आहे!

मातीच्या
ओल्या ओल्या वासात,
वाऱ्याच्या
खोल खोल श्वासात
झाडांचं
भिजणं सुंदर आहे;
माझ्या प्रेमा,
जगणं सुंदर आहे!

फुलांचे
वास विरून जातात;
दिलेले
श्वास सारून जातात!
असण्याइतकंच
नसणं सुंदर आहे;
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे..

जन्म...मंगेश पाडगावकर,


मी न घेतले, तरि मिळाले
कधीच मी जे घेऊ नये.
तुही दिल्याविण दिलेस सारे
कधी कुणी जे देऊ नये.

पिचलेल्या जन्मातुन रुजले
विजभारले सुर नवे.
ऐकण्यात जे व्यथेत मिटले
लोचन राधेचेच हवे.

श्याम घनांची उतट अनावर
कासाविस बरसात अशी.
काळोखाच्या यमुनेकाठी
धडधडणारी हवी पिशी.

मलाच नकळत माझे डोळे
यमुनेतुन वाहत जाती.
अंधपणातच चाचपतो मी
फुटल्या जन्माची माती.

दान तुझे हे घेण्यासाठी
फुटल्यावाचुन हात कुठे???
या भरलेल्या रित्या ओंजळीत
हिरवा हिरवा जन्म फुटे.

प्राजक्ताची फुले...


टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर‌ भिर‌ भिर‌ भिर‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे!

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले!

दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले!

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले!

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनि सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे!

नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं...मंगेश पाडगांवकर,


जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या ताटातली भाकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"
मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"

मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !