रविवार, २ मार्च, २०१४

या पाणवठ्यावर --- रॉय किणीकर


या पाणवठ्यावर आले किति घट गेले
किति डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले
किति पडुनि राहिले तसेच घाटावरती
किति येतिल अजुनि नाही त्यांना गणती

मी शब्द परंतू मूर्तिमंत तू मौन
मी पंख परंतू क्षितिजशून्य तू गगन
काजळरेघेवर लिहिले गेले काही
(
अन) मौनाची फुटली अधरावरती लाही

शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता
कोषात जाउनी झोपा मारीत बाता
रस रुप गंध अन स्पर्श पाहुणे आले
घर माझे नाही, त्यांचे आता झाले

वाकला देह वाकली इंद्रिये दाही
चिरतरुण राहिली देहातील वैदेही
मन नाचविते अन नेसविते तिज लुगडी
मन नपुंसक खेळे शृंगाराची फुगडी

हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना देहातील तो म्हणतो

ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा
एकदाच भरते स्माशानाताली जत्रा
खांद्यावर घेउनि शव फिरतो जन्म
राखेत अश्रुला फुटला हिरवा कोंब

पैठणी --- शांता शेळके,



फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा

 शांता शेळके 

टप टप टप टप टाकित टापा - शांता शेळके



टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

अजुनि चालतोंची वाट - ए. पां. रेंदाळकर



अजुनि चालतोंची वाट ! माळ हा सरेना!
विश्रांतिस्थळ केव्हां यायचें कळेना !

त्राण न देहांत लेश, पाय टेकवेना,
गरगर शिर फिरत अजी होय पुरी दैना !

सुखकर संदेश अमित पोंचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलों दिवाणा !

कांटयांवरि घातलाचि जीव तयासाठीं
हंसवाया या केली किति आटाआटी!

हेंच खास घर माझें म्हणुनि शीण केला,
उमगुनि मग चूक किती अश्रुसेक झाला;

दिन गेले, मास तसे वत्सरेंहि गेलीं,
निकट वाटतें जीवनसंध्या ही आली !

कुठुनि निघालों, कोठें जायचें न ठावें,
मार्गांतच काय सकल आयु सरुनि जावें !

काय निरुद्देश सर्व जीवन मम होतें
मरुसरितेपरि अवचित झरुनी जायचें ते?

पुरे! पुरे ही असली मुशाफरी आतां,
या धूळिंत दगडावर टेकलाच माथा !