रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

काळोखाची रजनी होती--केशवसुत


काळोखाची रजनी होती,
हृदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे,
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यांतुनि मी होतो हिंडत
एका खिडकीतुनि सुर तदा
पडले - दिड दा, दिड दा, दिड दा!

जड हृदयी जग जड हे याचा
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसे
ते न कळे: मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे!
मग मज कैसे रूचतील वदा
ध्वनि ते - दिड दा, दिड दा, दिड दा!

सोंसाट्याचे वादळ येते,
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीति
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते - दिड दा, दिड दा, दिड दा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा