शनिवार, २ एप्रिल, २०१६

लेझिम चाले जोरात - श्रीधर बाळकृष्ण रानडे



दिवस सुगीचे सुरु जाहले
ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम चाले जोरात!
चौघांनी वर पाय ऊचलले,
 सिंहासनीं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले...
ट्पढुमढुमढुमडफ तो बोले..
लेझिम चाले जोरात!
दिवटी फुरफुर करू लागली
पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम चाले जोरात!
भरभर डफ तो बोले घुमुनीं
लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागेंपुढे वाकुनी...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम चाले जोरात!
डफ तो बोले-लेझिम चाले
वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले...,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम गुंगे नादात्!
सिंहासन ते डुलु लागले,
शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम गुंगे नादात्!
दिनभर शेती श्रमूनी खपले
रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगेसतारवाले...,
छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !
पहाट झाली - तारा थकल्या,
 डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां...,
छनखळ झुणझिनलेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!

श्रीधर बाळकृष्ण रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा