कुसुमाग्रज. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुसुमाग्रज. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

आश्चर्य --कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर )

आश्चर्य

ती आदिवासी म्हातारी
प्राणांतिक भयाने धड्पडत
डोंगराच्या कडेला गेली
आणि चिकटून उभी राहिली
पालीसारखी खडकाला
उघडीबाघडी हज़ार सुरकुत्याच्या कातडीत कोंबलेली
हाडांची जीर्णाकृती
मी क्षणभर आदिवासी झालो
आणि तिच्याकडे पाहिल,
अहो आश्चर्य-
तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून
लोंबत होत आपलं पार्लमेंट
आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होत
आमचं साहित्यसमेंलन

--
कुसुमाग्रज़

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

उठा उठा चिऊताई- कुसुमाग्रज

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही !

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही !

लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे !

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या ?

बाळाचें नी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनियां दूर जाई
भूर भूर.

- कुसुमाग्रज

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

कणा - कुसुमाग्रज.


ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले ... केसांवरती पाणी.

क्षणभर बसला.. नंतर हसला.. बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहुनी आली.. गेली घरट्यात राहून.

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली.

भिंत खचली.. चूल विझली.. होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले.

कारभारनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे.. चिखल गाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा.