नदीच्या शेजारीं
गडाच्या खिंडारीं
झाडांच्या ओळींत
वेळूंच्या जाळींत
दिवसां दुपारीं
जांभळी अंधारी-
मोडकें देऊळ
त्यावरी पिंपळ,
कोण गे त्या ठायीं
रहातें गे आई ? १
चिंचांच्या शेंड्यांना
वडांच्या दाढ्यांना
ओढोनी हालवी
कोण गे पालवी ?
कोण गे जोरानें
मोठ्यानें मोठ्यानें
शीळ गे वाजवी
पांखरां लाजवी ?
सारखी किति वेळ
ऐकूं ये ती शीळ ? २
वाळलीं सोनेरी
पानें गे चौफेरी
मंडळ धरोनी
नाचती ऐकोनी
किती मीं पाहिलें
इत्केंची देखिलें,
झाडांच्या साउल्या
नदींत कांपल्या.
हांका मीं मारिल्या,
वांकोल्या ऐकिल्या. ३
उरांत धडधडे.
धावतां मी पडे,
पळालों तेथून-
कोण ये मागून ? ४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा