रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

लेझिम - श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे


लेझिम चाले जोरात


दिवस सुगीचे सुरु जाहले,  
ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले...,  
छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले,  
सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले...,  
ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली,  
पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली,  
छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं,  
लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी...,  
झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले
वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले...,  
छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले,  
शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले...
 छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले,  
रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले...,  
छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या,  
डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां...,  
छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् !  
चला जाऊया शेतात् !!

-
श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे

चांभार


झाडाखाली बघुनी सावली बसतो चांभार |  
ठाऊक मजला आहे त्याचा सर्व कारभार ||

आरी घेऊन देई शिवुनी जोडे तुटलेले |  
टाच सांधणे नाल जोडणे सर्वकाळ चाले ||

रापी याची लखलख करीत चराचरा चाले |  
धूर विडीचा मधून केव्हा खुशालीत बोले ||

वेळ मिळीतो शिवीत राही  नवा बूट काही |  
विकेल तेव्हा मिळेल पैसा मनात हर्ष आहे||

पोचे येउन जुने झाले डबके पाण्याचे |  
तेच परंतू सोबत करते प्रामाणिक कसे ||

केस पांढरे जरी जाहले हाथ चालतात | 
 तुटलेले पायतान कोणाचे नेत्र शोधतात ||

धंदा याचा पायतानाचा जरी | 
 नवे पायतान कधी न घातले याने पायात ||

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!--सुरेश भट,


मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!

विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!

सहज कधी तू घरात
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

माझे मन तूझे झाले---संजीवनी बोकील


माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले ॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी ॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन ॥

ओढ - संजीवनी बोकील


दाराशी पोरकं
गोजिरं बाळ
रडत असावं
तसं अनौरस सुख
अनेकदा येतं आयुष्यात...
उचलावं तर
ते आपलं नसल्याचं भय
अन
पाठ फिरवावी तर
त्याच्या मोहमुठीत
अडकलेला पदर...

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

कवी ........ दासू वैद्य

कवीच्या कवितेत
चिमण्या चिवचिवतात
पण कवी स्वतःच्या घरात
चिमण्यांना खोपा करू देत नाही
तसा त्याचा फारसा विरोध नसतो
चिमण्यांच्या खोप्याला
होतं काय, खोप्यातून कचरा खाली पडतो
आणि कवीची बायको वैतागते
झाडावर कविता लिहिणारा कवी
झाडाची मुळं भिंत पोखरतात
म्हणून हिरवीगार झाडं तोडतो
कवी टाळतो पाहणं
स्वतःच्या पायाला पडलेल्या भेगांकडे
कवी दुर्लक्ष करतो
बायकोच्या रापलेल्या चेहर्‍याकडे
आणि गिरवत बसतो सखीचं चित्र
खूप हळूवार बरंच निरागस,
कधी कवी घासलेटाच्या रांगेत उभा असतो
मग त्याच्या शब्दांना येतो घासलेटाचा वास
शाळेतल्या वर्गात
कवीची कविता
उदात्त भावना वगैरे म्हणून शिकवली जाते,
दरम्यान कुठल्यातरी अनामिक स्टेशनवर
कवीचा छिन्नविछिन्न देह रूळावर सापडतो,
भक्कम चाकाची रेलगाडी आपल्या अजस्त्र पायांनी
तुडवून गेलेली असते कवीला,
पंचनाम्यात कवीच्या खिशात
किराणामालाची यादी
आणि रेलगाडीवरची
एक लोभस कविता सापडते.

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

~जन्म - बा. सी. मर्ढेकर

नाही कोणी का कुणाचा । बाप-लेक, मामा-भाचा,
मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री? ॥

आई गोंजारते मुला । कासया हा बाप-लळा,
बाईलप्रीतीच्याही कळा । कशास्तव? ॥

येतें ऊर कां भरून । जाती आतडीं तुटून,
कुणी कुणाचा लागून । नाही जर? ॥

कैसा बांधला देखावा । जननमरणांतून देवा,
कुशीकुशींत गिलावा । रक्तमांसीं? ॥

का हें बांधकाम सुंदर । फक्त नश्वरतेचेंच मखर
अथवा दर्शनी महाद्वार । मिथ्यत्वाचें? ॥

मग कोठे रे इमारत । जिचें शिल्पकाम अद्भुत,
जींत चिरंतनाचा पूत । वावरें की? ॥

जरी कुठे ऐसें धाम । ज्याच्या पायऱ्याही अनुपम
आणि चुना-विटा परम । चिरस्थायी ॥

तरी मग रोकडा सवाल । कोरिसी हाडांचा महाल,
ठेविशी त्यांत हरिचा लाल । नाशवंत ॥

वास्तुशास्त्र कां बिलोरी । योजिशी येथेच मुरारी,
घडसी वस्तीला भाडेकरी। बिलोरीच?


जन्म - बा. सी. मर्ढेकर