बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

कृष्णजन्म रचना.... गदिमा

कृष्णजन्म

रचना.... गदिमा

अजन्मा जन्मासी आला
कारागिरी, अंधकारी कृष्णजन्म झाला || धृ ||

देवदुर्लभा सती देवकी
तिच्या तनूची करुनी पालखी
अनंत आले मानवलोके
प्रसव-व्यथेविन, ऊरी होता तो
उदरी अवतरला, अजन्मा जन्मासी आला ||१||

तम मावळले, तेज फाकले
चारच डोळे, दिपून झाकले
अरुप रुपी उभे ठाकले
देव दुंदुभी उधळू लागल्या,
मंजूळ स्वरमाला, अजन्मा जन्मासी आला ||२||

सुगंध सुटला एक अनामिक
मुग्ध शांतता होय सुवासिक
अद्भूत ल्याले वेष अलौकिक
धन्य होऊनी, वसुदेवांनी
नमस्कार केला, अजन्मा जन्मासी आला ||३||

परमानंदा सापडला स्वर
उमटे वाणी गंभीर कातर
"जाणियले मी तू सर्वेश्वर"
बालरुप घे, जगन्नायका
तार धरित्रीला, अजन्मा जन्मासी आला ||४||

रुप गायीचे घेऊन धरणी
आली होती तुझिया चरणी
अवघे आहे माझ्या स्मरणी
तिज रक्षाया, जनकपणा तू
वसुदेवा दिधला, अजन्मा जन्मासी आला ||५||

बघता बघता त्रिभुवन चालक
इच्छामात्रे झाला बालक
मेघ सावळे, नयनाल्हादक
उठे जन्मदे, कुशीत होता
रुदन शब्द ओला, अजन्मा जन्मासी आला ||६||

"सोsहं  सोsहं"  नाद उमटता
वळुनी कवळी देवकी माता
फुटला पान्हा, तान्हा बघता
तुटे शृंखला, बंधनातुनी
मोक्षकरी आला, अजन्मा जन्मासी आला ||७||

बाहेरून तो गर्जे वारा
नाचू लागल्या श्रावणधारा
भिजली दारे, भिजल्या कारा
झडली कुलुपे, कड्या उघडल्या
बंदिवास सरला, अजन्मा जन्मासी आला ||८||

मंगळवार, ९ जून, २०२०

खवळून उठले साती सागर

खवळून उठले साती सागर

शांता शेळके .

खवळून उठले साती सागर
बुडली धरती बुडले अंबर
प्रलयानंतर वटपत्रावर
पुन्हा संभवे नवीन सृष्टी
नको मानवा होऊ कष्टी !

मोडून पडता इवले घरटे
दुबळ्या पंखी बळ संचरते
काडी काडी चोच जमविते
पुन्हा निवारा घरट्यापोटी
नको मानवा होऊ कष्टी !

विनाश तेथे पुन्हा निर्मिती
जन्म मात करी मरणावरती
फिरुनी मानवकुळे नांदती
मधुर भविष्ये बघते दृष्टी
नको मानवा होऊ कष्टी !

हात राबता तो परमेश्वर
संसाराची ओढ अनावर
राखेमधुनी उभव पुन्हा घर
करी जीवनी अमृतवृष्टी
नको मानवा होऊ कष्टी !

शांता  शेळके

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

आधी गणाला रणी आणला गीतकार :- शाहीर पठ्ठे बापूराव ,



आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना ,

धन्य शारदा ब्रह्म नायका , 
घेऊन येईल रूद्रविणा ,
साही शास्रांचा मंत्र अस्रांचा , 

दाविला यंत्र खुणाखुणा ,
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना ,

सद्गुरू माझा स्वामी जग्दगुरु, 
मेरूवरचा धुरू आणाआणा .
ब्रह्मांड भवता तो एक सवता , 

दिवाच लाविला म्हणाम्हणा ,
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना .

माझा मनाचा मी तू पणाचा , 
जाळून केला चुनाचुना ,
पठ्ठेबापूराव कवी कवनाचा , 

हा एक तुकडा जुनाजुना ,
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना . 


 गीतकार :- पंचरंगी शाहीर पठ्ठे बापूराव ,

या डोळ्यांची दोन पाखरे..गीतकार : ग. दी. माडगुळकर

या डोळ्यांची दोन पाखरे..
फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील
असा कुठेही जगती..


दर्शन तुमचे हाच असे हो
या पक्ष्यांचा चारा
सहवासाविण नकोच यांना
अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यांस नभांगण,
घरकुल तुमची छाती...


सावलीतही बसतिल वेडी
प्रीतीच्या दडुनी
एका अश्रुमाजी तुमच्या 

जातील पण बुडुनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, 

ही तर अक्षय नाती..

 ..गीतकार : ग. दी. माडगुळकर

मागते मन एक काही , गीतकार :- शांता शेळके

  
मागते मन एक काही , 
दैव दुसरे घडविते .
उमलल्या आधीच कैसे , 

फुल पायी तुडविते ! 

खेळ नियती खेळते की 
पाप येते हे फळा ,
वाहाणा-या या जळाला 

कोणी मार्गी आडविते ,! 

ईश्वरेच्छ हीच किंवा 
संचिताचा शाप हा ,
चंद्ररेखा प्रतिपदेची 

कोण तिमिरी बुडविते ,
मागते मन एक काही , ,,.,..

 गीतकार :- शांता शेळके ,

मी सोडून सारी लाज, : सुधीर मोघे,

मी सोडून सारी लाज, 
अशी बेभान नाचले आज
की घुंगरु तुटले रे, 

घुंगरु तुटले रे

बहरली वीज देहांत, 
उतरले प्राण पायांत
वार्‍याचा धरुनी हात, 

अशी बेभान नाचले आज की...

मन वेडे तेथे जाय, 
ते जवळी होते हाय
अर्ध्यात लचकला पाय, 

तरी बेभान नाचले आज की...

गीतकार : सुधीर मोघे,

सांगा, मुकुंद कुणी हा पाहिला? गीतकार :- होनाजी बाळ

सांगा, मुकुंद कुणी हा पाहिला?
रासक्रीडा करिता वनमाळी, हो
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी

कुठे गुंतून बाई हा राहिला?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो

बोलावुनि सुतप्रती नंदजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
 म्हणे होनाजी देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
 
गीतकार :- होनाजी बाळ