शनिवार, १० जानेवारी, २०१५

ऐक जरा ना - इंदिरा संत




अंधाराने कडे घातले
घराभोवती;
जळधारांनी झडप घातली
कौलारावर.
एकाकीपण आले पसरत
दिशादिशांतुन
घेरायास्तव...
एकटीच मी
पडते निपचित मिटून डोळे.

हळूच येते दार घराचे
अंधारातुन;
उभे राहते जरा बाजुला.

"
ऐक जरा ना...
आठवते मज ती... टकटक
त्या बोटांची;
शहारते अन् रंगरोगणांखाली
एक आठवण,
गतजन्मीची;
आभाळातुन टपटपणा-या
त्या थेंबांची."

"
ऐक जरा ना"
दंडावरती हात ठेवुनी
कुजबुज करते अरामखुर्ची
"
आठवते का अजुन तुला ती
कातरवेळा?"

माहित नव्हते तुजला,
वाट तुझी तो पाहत होता
मिटून डोळे.
होते दाटुन असह्य ओझे;
होती धुमसत विद्युत् काळी;
अजून होते मजला जाणिव
निबिड वनांतिल...
मध्यरात्रिच्या वावटळीची
झपाटल्याची"

"
ऐक जरा ना"
कौलारांतुन थेंब ठिबकला
ओठावरती
"
ऐक जरा ना... एक आठवण.
ज्येष्ठामधल्या - त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षितसे
तया कोंडले जळधारांनी
तुझ्याचपाशी.
उठला जेव्हा बंद कराया
उघडी खिडकी,
कसे म्हणाला..
मीच ऐकले शब्द तयाचे...
'
या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय.""

धडपडले मी, उठले तेथुन;
सुटले धावत
त्या वास्तूतुन, त्या पाण्यातुन
दिशादिशांतुन,
हात ठेवुनी कानांवरती:
ऐकु न यावे शब्द कुणाचे,
कुणाकुणाचे :
"
ऐक जरा ना"
"
ऐक जरा ना"
"
ऐक जरा ना"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा