रविवार, ५ जानेवारी, २०२०

ज्योती: वि.म.कुलकर्णी


आधी होते मी दिवटी, 
शेतकऱ्यांची आवडती ।
 
झाले इवली मग पणती,
घराघरांतून मिणमिणती।
 
समई केले मला कुणी, 
देवापुढती नेवोनी ।
 
निघुनी आले बाहेर, 
सोडीत काळासा धूर।
 
काचेचा मग महाल तो, 
कुणी बांधुनी मज देतो ।
 
कंदील त्याला जन म्हणती, 
मीच तयांतिल परि ज्योती।
 
बत्तीचे ते रूप नवे, 
पुढे मिळाले मज बरवे।
 
वरात मजवाचून अडे,
 झगमगाट तो कसा पडे।
 
आता झाले मी बिजली, 
घरे, मंदिरे लखलखली ।
 
देवा ठाऊक काय पुढे, 
नवा बदल माझ्यात घडे।
 
एकच ठावे काम मला, 
प्रकाश द्यावा सकलांला ।
 
कसलेही मज रूप मिळो, 
देह जळो अन्‌ जग उजळो।
 
 
 : वि.म.कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा