बुधवार, १४ मे, २०१४

लवलव करी पात,:आरती प्रभू

लवलव करी पात, डोळं नाही थार्‍याला
एकटक पहावं कसं, लुकलूक तार्‍याला ॥धृ.॥

चवचव गेली सारी, जोर नाही वार्‍याला
सुटं सूटं झालं मन, धरु कसं पार्‍याला ॥१॥

कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची
रुणझूण हवा का ही, गाय उभी दाव्याची ॥२॥

तटतट करी चोळी, तुटतुटक गाठीची
उंबर्‍याशी जागी आहे, पारुबाई साठीची ॥३॥

गीतकार :आरती प्रभू
गायक :पद्मजा फेणाणी जोगळेकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
 

सूर मागू तुला मी कसा गीत : सुरेश भट

सूर मागू तुला मी कसा
जीवना तू तसा, मी असा ॥धृ.॥

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळीले
दुःख माझा तुझा आरसा ॥१॥

एकदा ही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो, खेळ झाला जसा ॥२॥

खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा ॥३॥

रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडापिसा ॥४॥

काय मागून काही मिळे ?
का तुला गीत माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा वसा ॥५॥

गीत : सुरेश भट

अजब सोहळा गीतकार : शांता शेळके

अजब सोहळा ! अजब सोहळा !
माती भिडली आभाळा ! ॥धृ.॥

मुकी मायबाई
तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा ॥१॥

किती काळ साहील ?
किती मूक राहील ?
वादळली माती करी वा-याचा हिंदोळा ! ॥२॥

कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे, आता बघ उघडून डोळा ! ॥३॥

मातीची धरती
देह मातीचा वरती
माती जागवू दे मातीचा जिव्हाळा ! ॥४॥

गीतकार : शांता शेळके
संगीतकार : भास्कर चंदावरकर
गायक : रवींद्र साठे

अजुनी रुसून आहे,

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! ॥१॥

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ! ॥२॥

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ॥३॥

गीतकार : आ. रा. देशपांडे
संगीतकार :कुमार गंधर्व
गायक :कुमार गंधर्व
 

रविवार, ११ मे, २०१४

सावळाच रंग तुझा

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी

सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी

सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी

सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंदर पाहू केव्हा उगवतो

सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान


-ग.दि.माडगूळकर

संत ....ग्रेस,


पांढर्‍या शुभ्र हत्तींचा ... ग्रेस

पांढर्‍या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला
त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या
पांढर्‍या शुभ्र हत्तींनी मग दोंगर उचलून धरले,
अन् तसे काळजा खाली अस्तींचे झुंबर फुटले
पांढरे शुभ्र हत्ती , अंधारबनातून गेले,
ते जिथे थांबले होते, ते वृक्षही पांढरे झाले
- “संध्याकाळच्या कविता”, ग्रेस