गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

मन पिसाट माझे अडले रे, थांब जरासा गीतकार : ना.घ.देशपांडे

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा

वनगान रान गुणगुणले रे
दूरांत दिवे मिणमिणले रे
मधुजाल तमाने विणले रे
थांब जरासा 


ही खाली हिरवळ ओली
कुजबुजून बोलू बोली
तिमिराची मोजू खोली रे
थांब जरासा

नुसतेच हे असे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे
थांब जरासा

गीतकार : ना.घ.देशपांडे, गायक : कृष्णा कल्ले, संगीतकार : यशवंत देव

धुंद एकांत हा गीत - जगदीश खेबूडकर




धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा
जाण नाही मला प्रीत आकारली
सहज तू छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा

गंधवेडी कुणी, लाजरी बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीवरी
यौवनाने तिला आज शृंगारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा


गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा

रोमरोमांतुनी गीत मी गाइले
दाट होता धुके स्वप्न मी पाहिले
पाहता पाहता रात्र मंथारली
आज बाहुत या, लाज आधारली
सहज तू छेडीता तार झंकारली

 संगीत - सुधीर फडके
स्वर आशा भोसले,सुधीर फडके
चित्रपट - अनोळखी

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

किलबिल किलबिल पक्षी बोलती , शान्ता शेळके

किलबिल किलबिल पक्षी बोलती , 
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती ,
पानोपानी फुले बहरती , 

फुलपाखरे वर भिरभिरती ,
स्वप्नी आले काही , 

एक मी गाव पाहिला बाई !

त्या गावाची गंमत न्यारी , 
तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे , कुणी धाकटे , 

कुणी न बसते इथे एकटे
सारे हसती , गाति नाचती , 

कोणी रडके नाही 

नाही पुस्तक , नाही शाळा , 
हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो , पडो , 

धडपडो , लागत कोणा नाही 

तिथल्या वेली गाणी गाती , 
पर्‍या हासर्‍या येती जाती
झाडावरती चेंडू लटकती , 

शेतामधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते , 

उणे न कोठे काही 


गीत - शान्ता शेळके

रविवार, ५ जानेवारी, २०२०

आजारपण – भानुदास


पडु आजारी, मौज हीच वाटे भारी ।।ध्रु।।
नकोच जाणे मग शाळेला,
काम कुणी सांगेल न मजला

मउ मउ गादी निजावयाला,
चैनच सारी, मौज हीच वाटे भारी ।।१।।

मिळेल सांजा, साबुदाणा,
खडिसाखर, मनुका, बेदाणा

संत्री, साखर, लिंबू आणा
जा बाजारी, मौज हीच वाटे भारी ।।२।।

भवती भावंडांचा मेळा,
दंगा थोडा जरि कुणि केला

मी कावुनि सांगेन तयाला,
‘जा बाहेरी’, मौज हीच वाटे भारी ।।३।।

कामे करतिल सारे माझी,
झटतिल ठेवाया मज राजी

बसेल गोष्टी सांगत आजी,
मज शेजारी, मौज हीच वाटे भारी ।।४।।

असले आजारीपण गोड,
असून कण्हती का जन मूढ ?

हे मजला उकलेना गूढ-
म्हणुन विचारी, मौज हीच वाटे भारी ।।५।।


  – भानुदास

ज्योती: वि.म.कुलकर्णी


आधी होते मी दिवटी, 
शेतकऱ्यांची आवडती ।
 
झाले इवली मग पणती,
घराघरांतून मिणमिणती।
 
समई केले मला कुणी, 
देवापुढती नेवोनी ।
 
निघुनी आले बाहेर, 
सोडीत काळासा धूर।
 
काचेचा मग महाल तो, 
कुणी बांधुनी मज देतो ।
 
कंदील त्याला जन म्हणती, 
मीच तयांतिल परि ज्योती।
 
बत्तीचे ते रूप नवे, 
पुढे मिळाले मज बरवे।
 
वरात मजवाचून अडे,
 झगमगाट तो कसा पडे।
 
आता झाले मी बिजली, 
घरे, मंदिरे लखलखली ।
 
देवा ठाऊक काय पुढे, 
नवा बदल माझ्यात घडे।
 
एकच ठावे काम मला, 
प्रकाश द्यावा सकलांला ।
 
कसलेही मज रूप मिळो, 
देह जळो अन्‌ जग उजळो।
 
 
 : वि.म.कुलकर्णी

एकवार पंखावरुनी ... ग.दि.मा.

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात 


धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात

वने, माळराने, राई, ठायी ठायी केले स्नेही
तुझ्यविना नव्हते कोणी आत अंतरात 


फुलारून पंखे कोणी तुझ्यापुढे नाचे राणी
तुझ्या मनगटी ही बसले कुणी भाग्यवंत

मुका बावरा मी भोळा, पडेन का तुझिया डोळा
मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात 



ग .दि. माड्गुळ्कर

भेट तुझी माझी स्मरते.........मंगेश पाडगांवकर

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची


कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते


क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते


केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या 



मंगेश पाडगांवकर